नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी रात्री मुंबईहून इंग्लडला रवाना झाला. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तिथे तयारी सुरू केली आहे. पहिल्या सराव सत्रादरम्यान उपकर्णधार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या हाताला दुखापत झाली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलला भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याची संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दुखापतीतून परतल्यानंतर ऋषभ पंतने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. परंतु त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २० जूनपासून लीड्समध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने रविवारी लॉर्ड्सवर सराव करून दौऱ्याची सुरुवात केली. यादरम्यान, सराव करताना पंतच्या डाव्या हाताला दुखापत झाली. मात्र, पंतची दुखापत गंभीर नव्हती, असे संघाच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.
तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी नावाच्या या मालिकेतील पहिली कसोटी २० जून रोजी लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू होणार आहे. त्यानंतर एजबॅस्टन (२ ते ६ जुलै), लॉर्ड्स (१०-१४ जुलै), ओल्ड ट्रॅफर्ड (२३-२७ जुलै) आणि द ओव्हल (४ ते ८ ऑगस्ट) येथे सामने होतील. ही मालिका २०२५-२७ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग मानली जाते.