कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (KKR) सामन्यात बेजबाबदारपणे आपली विकेट बहाल केल्यामुळे ऋषभ पंतवर जोरदार टीका होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पंतच्या बाद होण्यावर सडकून टीका करताना, मधल्या फळीतील फलंदाजांनी अधिक जबाबदारीने खेळण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.
कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या मुकुल चौधरीने लखनौ सुपर जायंट्सला (LSG) अखेरच्या क्षणी सावरले आणि दोन गुण मिळवून दिले. मात्र, या विजयामुळे लखनौच्या फलंदाजीतील उणिवा लपलेल्या नाहीत. प्रत्येक सामन्यागणिक ऋषभ पंत आणि निकोलस पूरन यांची खराब फॉर्मची चिंता प्रकर्षाने जाणवत आहे. चालू हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) विजयात पंतने योगदान दिले असले तरी, एकूणच त्याची फलंदाजी लयबद्ध वाटत नाहीये. केकेआरविरुद्ध जेव्हा संघाला मधल्या फळीत स्थैर्याची गरज होती, तेव्हा पंत अवघ्या १० धावा करून बाद झाला.
पंत बाद झाल्यामुळे फलंदाजीच्या फळीवर प्रचंड दडपण आले आणि सामना लखनौच्या हातातून निसटतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. एका टप्प्यावर सामना गमावण्याची चिन्हे दिसत असताना, मुकुलने संयमी आणि अविस्मरणीय खेळी करत सामन्याचा नूर पालटला. मुकुलच्या कामगिरीमुळे लखनौने विजय तर मिळवला, मात्र मधल्या फळीतील सातत्यहीन आणि तकलादू कामगिरीचा प्रश्न अद्याप कायम आहे.
मोहम्मद कैफने पंतच्या फलंदाजीवर परखड मत व्यक्त करताना सांगितले की, डावाला आकार देण्याची महत्त्वाची संधी पंतने गमावली. पॉवरप्लेमध्ये लखनौची स्थिती मजबूत असताना, अनुभवी खेळाडू म्हणून पंतने अखेरपर्यंत खेळून सामना संपवणे अपेक्षित होते, असे कैफला वाटते.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना कैफ म्हणाला, "संघाला गरज असताना पंतने खेळपट्टीवर थांबणे आवश्यक होते. तो २०१६ पासून आयपीएल खेळत असलेला एक अनुभवी खेळाडू आहे. तो जेव्हा फलंदाजीला आला, तेव्हा परिस्थिती फारशी कठीण नव्हती. लखनौने पहिल्या ५ षटकांत ४१ धावा केल्या होत्या. अशा वेळी एका फलंदाजाने जबाबदारी स्वीकारून अखेरपर्यंत टिकणे गरजेचे होते आणि ती भूमिका पंतची होती."
पंतवर टीका करताना कैफ पुढे म्हणाला की, कर्णधार म्हणून त्याने महत्त्वाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अधिक जबाबदारी दाखवायला हवी. केवळ एक चांगली खेळी पुरेशी नसते, असे सांगून कैफने त्याला परिस्थितीचे भान राखण्याचा सल्ला दिला.
कैफ पुढे म्हणाला, "कर्णधार म्हणून जर तुम्ही जबाबदारी स्वीकारली नाही, तर तुम्ही तुमच्या संघाला विजय मिळवून देऊ शकत नाही. हो, त्याने हैदराबादविरुद्ध चांगली कामगिरी केली, पण आता त्याला सातत्य राखण्याची गरज आहे. एक चांगली खेळी खेळायची आणि त्यानंतरच्या काही सामन्यांत अपयशी ठरायचे, हे पुरेसे नाही. त्याला सामन्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्या खेळाचा वेग कधी वाढवायचा, हे शिकावे लागेल. लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरपर्यंत उभे राहणे हे कर्णधाराचे कर्तव्य आहे आणि त्यावर पंतला काम करावे लागेल."