former cricketer statement on Rishabh Pant
नवी दिल्ली : टीम इंडियाचा यष्टिरक्षक, फलंदाज ऋषभ पंत याच्यासाठी सध्याचा काळ आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. आगामी टी-२० विश्वचषक २०२६ च्या संघातून वगळल्यानंतर, आता न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेतूनही त्याला डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुखापतीतून सावरून परतल्यानंतर पंतला आपल्या लयीसाठी संघर्ष करावा लागत असून, दरम्यानच्या काळात लोकेश राहुलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.
ऋषभपंतच्या खराब फॉर्मवर भाष्य करताना भारताचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी त्याच्या फलंदाजीच्या क्रमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दासगुप्ता म्हणाले की, "टी-२० क्रिकेटमध्ये पंत नक्की काय आहे? तो पहिल्या तीन क्रमांकावरील फलंदाज आहे, की मधल्या फळीतील फलंदाज की फिनिशर? त्याला स्वतःला या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील."
दासगुप्ता यांच्या मते, "माझ्या मते टी-२० मध्ये तो पहिल्या तीन क्रमांकावर खेळणारा फलंदाज आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेत इशान किशन आणि ध्रुव जुरेल यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करून आपले दावे प्रबळ केले आहेत. विशेषतः इशान किशनच्या पुनरागमनामुळे पंतची अडचण वाढली आहे.
दीप दासगुप्ता यांनी पंतला सल्ला दिला आहे की, त्याने सध्या सुरू असलेल्या 'विजय हजारे ट्रॉफी'मध्ये जास्तीत जास्त धावा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. "पंतने आता फक्त फलंदाजी आणि फलंदाजीच करायला हवी. त्याने दिल्लीसाठी ७० धावांची चांगली खेळी केली आहे. जिथे संधी मिळेल तिथे त्याने धावांचा पाऊस पाडला पाहिजे. वनडे क्रिकेटमध्ये आपली नेमकी शैली ओळखली पाहिजे," असे दासगुप्ता यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना स्पष्ट केले.
ऋषभ पंतने आपला शेवटचा एकदिवसीय सामना ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याचा संघात समावेश होता, मात्र त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतूनही त्याला वगळले गेल्यास, त्याचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.