Rinku Singh Father Death News: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगला मोठा धक्का बसला आहे. त्याचे वडील खानचंद सिंग यांचे स्टेज 4 कॅन्सरशी झुंज देत असताना आज शुक्रवारी निधन झाले. माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावर ही माहिती देत रिंकू आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
खानचंद सिंग यांच्यावर ग्रेटर नोएडातील यथार्थ रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रिंकू सिंगने वडिलांची प्रकृती गंभीर असल्यामुळे टी20 विश्वचषक मधील सुपर-8 सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या कॅम्पमधून तात्पुरता ब्रेक घेतला होता.
झिम्बाब्वेविरुद्धच्या चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवरील सामन्यासाठी तो परतला होता. मात्र, टीममध्ये त्याला संधी मिळाली नाही; संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनला त्याच्या जागी घेतले. तरीही रिंकू संघासोबत मैदानावर दिसला. सुरुवातीला तो सूर्यकुमार यादवसाठी सबस्टिट्यूट फील्डर म्हणून उतरला आणि नंतर अभिषेक शर्मा उपचारासाठी बाहेर गेल्यावरही त्याने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळली.
हरभजन सिंग यांनी एक्सवर लिहिले, “रिंकू सिंगचे वडील श्री खानचंद सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मन व्यथित झाले. विश्वचषकाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना रिंकू आणि त्याच्या कुटुंबासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”
रिंकू सिंगच्या क्रिकेट प्रवासात त्यांच्या वडिलांचा मोठा वाटा होता. अलीगढ येथे एलपीजी सिलिंडर डिलिव्हरीचे काम करत असतानाही त्यांनी मुलाच्या स्वप्नांसाठी कोणतीही कमी पडू दिली नाही. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी रिंकूला क्रिकेटमध्ये मोठं होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. गेल्या वर्षी रिंकूने वडिलांना सुमारे 3.19 लाख रुपयांची कावासाकी निंजा बाईक भेट दिली होती. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या रिंकू सिंगसाठी हा दुःखाचा क्षण आहे.