स्पोर्ट्स

Rinku Singh Struggle : रिंकू सिंहला मिळाले होते झाडलोट, साफ-सफाईचे काम; पण ‘असा’ बनला कोट्यवधींचा मालक

भारतीय संघातील रिंकू सिंह याचा क्रिकेट प्रवास खूपच कठीण होता. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. एकेकाळी त्याचे वडीलही त्याला क्रिकेट खेळण्यास विरोध करत होते, पण कठोर परिश्रमाने रिंकूने सर्व काही बदलून टाकले.

रणजित गायकवाड

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह याने रविवारी (8 जून) लखनऊ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा केला. या कार्यक्रमाला क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) साठी आयपीएलमध्ये सलग पाच षटकार मारून अशक्यप्राय विजय मिळवणा-या या खेळाडूने भारताच्या टी-20 संघाकडून खेळतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. पण या यशस्वी क्रिकेटपटूच्या मागे एक अशी कहाणी आहे, जी कठोर मेहनत आणि संघर्षाने भरलेली आहे. मात्र, कितीही अडचणी आल्या तरी हार न मानता स्वप्नांचा पाठलाग केला तर यश नक्कीच मिळते, ही प्रेरणा रिंकूच्या प्रवासातून मिळते.

गरीबी आणि अडथळ्यांनी भरलेले बालपण

रिंकू सिंह याचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे एका साधारण कुटुंबात झाला. पाच भावंडांमध्ये रिंकूचा क्रमांका हा तिसरा. त्याचे वडील खानचंद्र सिंह एलपीजी सिलिंडर वितरणाचे काम करायचे. तर आई बीना देवी गृहिणी होत्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक होती की त्यांना सिलिंडर कंपनीच्या स्टॉकयार्डमधील दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहावे लागले. रिंकूचा भाऊ कोचिंग सेंटरमध्ये झाडू मारण्याचे काम करायचा. अशाच कामाची ऑफर रिंकूलाही मिळाली होती. घरच्यांनीही उदरनिर्वाहासाठी त्याच्यावर हे काम करण्यासाठी दबाव टाकला. पण रिंकूने ठामपणे नकार दिला. ‘मला क्रिकेट खेळायचे आहे, हेच माझे भविष्य आहे.’ असे त्याने स्पष्टपणे सांगितले.

रिंकूला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. पण त्याच्या कुटुंबाला त्याच्या या आवडीला पाठिंबा देणे शक्य नव्हते. वडिलांनी अनेकदा त्याला क्रिकेट न खेळण्यासाठी मारले. त्यांना वाटायचे की अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. पण रिंकूच्या मनात क्रिकेटबद्दलची आग कधीच विझली नाही. त्याने टेनिस बॉल क्रिकेट खेळून आपली कौशल्ये दाखवले आणि स्थानिक स्पर्धांमधून आपले नाव कमवायला सुरुवात केली.

क्रिकेटमधील पहिली पायरी

रिंकूच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण तेव्हा आला, जेव्हा त्याने दिल्लीतील एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकून मोटरबाइक मिळवली. ही बाईक त्याने आपल्या वडिलांना भेट दिली. या कामगिरीने वडिलांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी रिंकूच्या क्रिकेटमधील करिअरला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. रिंकूचे प्रशिक्षक मसूद अमीन आणि मोहम्मद जिशान यांनीही त्याला खूप प्रोत्साहन देत त्याला पहिले क्रिकेट किट भेट दिले.

रिंकूने वयाच्या 16व्या वर्षी 2014 मध्ये उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात 83 धावा काढून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर 2016 मध्ये त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. 2018-19 रणजी ट्रॉफीमध्ये त्याने 953 धावा काढल्या. यात त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके ठोकली. यासह उत्तर प्रदेशसाठी तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.

आयपीएल : स्वप्नांचा पाठलाग

रिंकूच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट आला, जेव्हा त्याला 2017 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलसाठी 10 लाखांना विकत घेतले. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याला 80 लाखांना विकत घेतले आणि येथून त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. या रक्कमेने रिंकूने आपल्या कुटुंबाला घर घेऊन दिले आणि भावंडांच्या लग्नासाठी आर्थिक मदत केली.

आयपीएल 2022 मध्ये रिंकूने आपली चमक दाखवली. त्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 15 चेंडूत 40 धावा काढल्या. ज्यामुळे KKR जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. पण खरी जादू घडली 2023 मध्ये जेव्हा त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात यश दयालच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार मारून 29 धावांचा यशस्वी पाठलाग करत KKR ला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. हा क्षण आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला.

आंतरराष्ट्रीय पदार्पण आणि भावनिक क्षण

2023 मध्ये रिंकूने आयर्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी पदार्पण केले. पदार्पणानंतर तो म्हणाला, ‘मी जेव्हा माझ्या आई-वडिलांशी बोलतो, तेव्हा आम्ही भावूक होतो. माझी आई दुसऱ्यांकडून पैसे उसने घेऊन माझ्या क्रिकेटच्या गरजा पूर्ण करायची.’

रिंकूच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचे बलिदान आणि त्याची मेहनत आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या ‘God’s Plan’ टॅटूचा अर्थ आहे KKR ने त्याला 2018 मध्ये 80 लाखांना विकत घेतलेला तो क्षण, ज्याने त्याच्या कुटुंबाचे आयुष्य बदलले.

प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

रिंकूच्या यशाची कहाणी केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही. त्याने आपल्या यशाचा सदुपयोग सामाजिक कार्यासाठीही केला. 2023 मध्ये त्याने नवोदित क्रिकेटपटूंसाठी 50 लाख रुपये देऊन एक वसतिगृह उभारले, ज्यामुळे आर्थिक अडचणींमुळे क्रिकेट खेळू न शकणाऱ्या खेळाडूंना संधी मिळेल.

रिंकूचे प्रशिक्षक आणि KKR चे माजी प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मॅक्युलम म्हणाले, ‘रिंकू हा असा खेळाडू आहे, जो KKR साठी पुढील अनेक वर्षे महत्त्वाचा असेल आणि कदाचित भविष्यात भारतासाठीही मोठी कामगिरी करेल.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT