T20 World Cup 2026 | ...तर कोलकाता, अहमदाबादच्या चाहत्यांना रिफंड मिळणार File Photo
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 | ...तर कोलकाता, अहमदाबादच्या चाहत्यांना रिफंड मिळणार

पाकचा संघ सेमीफायनल किंवा फायनलला पोहोचल्यास तिकिटांचे पैसे परत देणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई; वृत्तसंस्था : आगामी टी-20 विश्वचषकाच्या बाद फेरीतील सामन्यांच्या स्थळांबाबत आयोजकांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. पाकिस्तानचा संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहोचल्यास सामन्यांच्या नियोजित स्थळांमध्ये बदल करण्यात येणार असून, अशा परिस्थितीत तिकीट खरेदी करणार्‍या चाहत्यांना पूर्ण परतावा दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

असे असेल उपांत्य फेरीचे गणित

स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरी फ्लोटिंग व्हेन्यू तत्त्वावर आधारित असेल. हा सामना कोलकात्याचे ईडन गार्डन्स किंवा कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियम यांपैकी एका ठिकाणी खेळवला जाईल. दुसरीकडे, दुसरी उपांत्य फेरी मुंबईच्या वानखेडेवर निश्चित करण्यात आली आहे.

जर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर त्यांचा सामना 4 मार्च रोजी कोलंबोमध्ये होईल. जर पाकिस्तान बाद फेरीत पोहोचू शकला नाही, मात्र श्रीलंका पात्र ठरली आणि त्यांचा सामना भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाशी असेल, तर ही पहिली उपांत्य फेरी कोलंबोमध्येच खेळवली जाईल. याउलट, वरील दोन्ही परिस्थिती उद्भवल्या नाहीत किंवा भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार असेल, तर पहिली उपांत्य फेरी 4 मार्चला कोलकात्यात होईल.

अंतिम सामन्याचे ठिकाणही बदलणार?

नियोजित वेळापत्रकानुसार अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. मात्र, पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारल्यास हा सामना अहमदाबादऐवजी कोलंबोला हलवण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT