पॅरिस : रिअल माद्रिदचा फॉरवर्ड खेळाडू किलियन एम्बापेच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असल्याची माहिती त्याच्या स्पॅनिश क्लबने दिली. एम्बापेला सातत्याने वेदना जाणवत असल्याचे आढळून आले असून यातून सावरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, याबाबत क्लबने कोणतीही माहिती दिलेली नाही.
यादरम्यान, एम्बापे किमान 3 आठवड्यांसाठी मैदानाबाहेर असेल. त्यानंतरच त्याला पुनरागमनाबाबत विचार करता येईल, असे काही फ्रेंच प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. एम्बापेला गेल्या काही आठवड्यांपासून गुडघ्याला त्रास होत होता. बुधवारी सकाळी करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यावर उपचाराची रूपरेषा आता निश्चित करण्यात आली आहे.
एम्बापे या हंगामात उत्तम बहरात राहिला. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने 2025 मध्ये माद्रिदसाठी आपला 59 वा गोल केला आणि याचवेळी त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या एका वर्षातील सर्वाधिक गोल करण्याच्या क्लब विक्रमाची बरोबरी केली होती. 2024 च्या उन्हाळ्यात माद्रिदमध्ये सामील झालेल्या या माजी पीएसजी खेळाडूने या हंगामात माद्रिदसाठी 29 वेळा गोल केले आहेत. यात लीगमधील 18 गोलचा समावेश आहे. माद्रिदचा पुढील सामना रविवारी ला लीगामध्ये रिअल बेटिसविरुद्ध होणार आहे.