कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2025 च्या पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन संघांत झाला. आरसीबीने पहिल्याच सामन्यात आपला पॉवरगेम दाखवताना गतविजेत्या केकेआरचा 7 विकेटस्नी पराभव केला. अजिंक्य रहाणे (56) आणि सुनील नारायण (44) यांच्या शतकी भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने 174 धावा केल्या. हे आव्हान आरसीबीने 16.2 षटकांत 3 विकेटस्च्या मोदबदल्यात पूर्ण केले. रनमशिन विराट कोहलीने 36 चेंडूंत धुवाँधार 59 धावा केल्या. फिल सॉल्टने 56 धावांचे योगदान दिले. कोहलीचा हा 400 वा टी-20 सामना होता.
कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर झालेल्या सलामीच्या सामन्यात केकेआरच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. विराट त्याचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील फॉर्म पुढे घेऊन आल्यासारखा खेळत होता. फिल सॉल्टही आक्रमक झाला होता. दोघांनी 22 चेंडूॅत संघाचे अर्धशतक फलकावर लागले. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताचा यशस्वी गोलंदाज वरुण यादवला दोघांनी चांगला चोप दिला. दोघांचा खेळ इतका पॉवरफुल्ल होता की पॉवर प्लेमध्ये दोघांनी 80 धावा फटकावल्या.
सॉल्टने केकेआरच्या आक्रमणाची चव बिघडून टाकताना 25 चेंडूंत पन्नाशी गाठली, पण वरुणने त्याला 56 धावांवर थोपवले. त्याच्या जागी आलेल्या देवदत्त पडिक्कलला हा टेम्पो टिकवता आला नाही. तो 10 धावांवर परतला. दरम्यान, विराटने 30 चेंडूंत अर्धशतक गाठले. त्याच्या साथीला आलेल्या कर्णधार रजत पाटीदारने विराटपेक्षाही जास्त स्पीड पकडला. 16 चेंडूंत तो 34 धावा करून बाद झाला. यावेळी आरसीबीला 27 चेंडूंत 13 धावा हव्या होत्या. लियाम लिव्हिंगस्टोनने दोन चौकार आणि एक षटकार ठोकून विषय संपवून टाकला. विराट 59 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून आरसीबीने गोलंदाजी स्वीकारली. कोलकाताची सुरुवात धक्कादायक झाली. पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. यानंतर, सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनी दुसर्या विकेटसाठी 55 चेंडूंत 103 धावांची भागीदारी केली. कर्णधार रहाणेने फक्त 25 चेंडूंत आयपीएल कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक झळकावले. तो 31 चेंडूंत 56 धावा काढून बाद झाला. वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू सुनील नारायण याने पाच चौकार आणि तीन षटकारांसह 44 धावा केल्या. यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी एकामागून एक विकेट टाकल्या. यामध्ये रघुवंशी 30, वेंकटेश अय्यर 6, आंद्रे रसेलने 4, हर्षित राणा 5 इतक्याच धावा करू शकले. केकेआरने 20 षटकांत आठ विकेटस् गमावून 174 धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेटस् घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकांत 8 बाद 174 धावा. (अजिंक्य रहाणे 56, सुनील नारायण 44. कृणाल पंड्या 3/29.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : 16.2 षटकांत 3 बाद 177 धावा. (विराट कोहली 59, फिल सॉल्ट 56. सुनील नारायण 1/27)