अहमदाबाद; वृत्तसंस्था : यशस्वी जैस्वाल (45), रियान पराग (36) व शिमरॉन हेटमायरच्या (26) उपयुक्त खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 'आयपीएल'मधील एलिमिनेटर लढतीत 'आरसीबी'च्या स्वप्नवत पुनरागमनाच्या आशाअपेक्षांचा अक्षरश: धुव्वा उडवला आणि क्वालिफायर-2 मध्ये जोरदार धडक मारली. अगदी स्लॉग ओव्हर्समध्ये दोन्ही संघांत येथे रस्सीखेच रंगली खरी. मात्र, अंतिम क्षणी राजस्थानने या लढतीला एकतर्फी स्वरूप दिले. 'आरसीबी'ने 20 षटकांत 8 बाद 172 धावा केल्यानंतर राजस्थानने 19 षटकांत 6 बाद 174 धावांसह एककलमी वर्चस्व गाजवले. एकीकडे राजस्थानने येथे सलग 4 पराभवांची श्रृंखला खंडित केली, तर दुसरीकडे 'आरसीबी'ला यंदा आणखी एकदा 'आयपीएल' जेतेपदाने हुलकावणी दिल्याचे सुस्पष्ट झाले!
प्रारंभी, राजस्थानला विजयासाठी 173 धावांचे आव्हान असताना यशस्वी जैस्वालने एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांचे अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिले होते. टॉम कोहलर-लॅडमोर (20), संजू सॅमसन (17), ध्रुव ज्युरेल (8) स्वस्तात बाद झाल्याने हा राजस्थानसाठी मोठा धक्का होता. 18 व्या षटकात रियान पराग 36 धावांवर बाद झाला. हेटमायर मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने राजस्थानला आणखी एक धक्का बसला होता. मात्र, रोव्हमन पॉवेलने अंतिम क्षणी सर्वस्व पणाला लावत असताना त्याला नशिबाचीही साथ लाभली आणि याचमुळे राजस्थानला यश खेचून आणता आले. पॉवेलने 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचला आणि इथेच राजस्थानच्या दणकेबाज विजयावर अगदी थाटात शिक्कामोर्तब झाले!
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना प्लेसिस बाद झाल्याने आरसीबीला चौथ्याच षटकात पहिला धक्का सोसावा लागला होता. प्लेसिसचा बोल्टच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर रोव्हमन पॉवेलने डीप मिडविकेटवरून धावत डाईव्हवर अप्रतिम झेल टिपला आणि राजस्थानला येथे पहिला ब्रेकथ्रू मिळाला.
अश्विनच्या कॅरम बॉलवर कॅमेरून ग्रीनने कव्हरवर तैनात पॉवेलकडे सोपा झेल दिला. 13 व्या षटकात ग्लेन मॅक्सवेल ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने 'आरसीबी'साठी हा आणखी एक धक्का ठरला. मॅक्सवेलचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकला आणि यामुळे 'आरसीबी'च्या पदरी येथेही निराशा आली. अश्विनचा ऑफब्रेक चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात मॅक्सवेल चकला. ज्युरेलने लाँगऑनवर झेल टिपत मॅक्सवेलची खेळी संपुष्टात आणली.
रजत पाटीदारने 22 चेंडूंत 34 धावा केल्या असल्या, तरी धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात अवेशच्या गोलंदाजीवर त्याने रियान परागकडे झेल दिला. पायचीत बादवर 'डीआरएस' घेतल्याने एकदा बचावलेल्या दिनेश कार्तिकला 13 चेंडूंत 11 धावांवर परतावे लागले. जैस्वालने कव्हरवरून मागे धावत येत कार्तिकचा झेल टिपला. 17 चेंडूंत 32 धावा जमवणार्या लोमरोरने अवेशच्या गोलंदाजीवर डीप कव्हरवरील पॉवेलकडे सोपा झेल दिला. डावातील शेवटच्या चेंडूवर कर्ण शर्मा बाद झाला आणि यानंतर राजस्थानसमोर 173 धावांचे आव्हान असेल, हे स्पष्ट झाले.
राजस्थान रॉयल्सच्या रोव्हमन पॉवेलने या लढतीत चार फलंदाजांचे झेल घेतले. फाफ ड्युप्लेसिस, कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर व कर्ण शर्मा यांचा त्यात समावेश राहिला. प्ले-ऑफ लढतीत एखाद्या खेळाडूने चार झेल टिपण्याची ही 'आयपीएल' इतिहासातील पहिलीच वेळ ठरली.
'आरसीबी'च्या आठव्या षटकात स्लॉग स्वीपच्या प्रयत्नात विराट कोहलीने आपली विकेट गमावली. चहलच्या लेगब्रेक चेंडूवर विराटने स्पिनविरुद्ध फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि डीप मिडविकेटवरील फेरेराकडे थेट झेल गेला. त्यापूर्वी विराटने 8 हजार धावांचा टप्पा पार केला होता.