RCB vs GT Final 2026 | आरसीबी की गुजरात? फैसला आज 
स्पोर्ट्स

RCB vs GT Final 2026 | आरसीबी की गुजरात? फैसला आज

आरसीबीची स्फोटक फलंदाजी व गुजरातची भेदक गोलंदाजी यातच रंगणार मुख्य लढत

पुढारी वृत्तसेवा

अहमदाबाद; वृत्तसंस्था : आयपीएलच्या मैदानावरील सर्वात मोठ्या आणि अनपेक्षित महासंग्रामाचा थरार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. एकीकडे पहिल्या चेंडूपासून ‘करा किंवा मरा’ या आक्रमकतेने खेळणारा आणि सलग दुसर्‍या जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी आरसीबी तर दुसरीकडे आपल्या कुशल रणनीतीने कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पलटवू शकणारा भक्कम गुजरात टायटन्सचा संघ येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार्‍या ग्रँड फिनालेत आमनेसामने भिडतील, त्यावेळी अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष त्याकडे लागून राहिलेले असणार आहे. आरसीबीची स्फोटक फलंदाजी व गुजरातची भेदक गोलंदाजी यात प्रामुख्याने ही लढत रंगू शकते.

कागदावर पाहिल्यास, विद्यमान विजेता आरसीबी सध्या जेतेपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे. या संपूर्ण हंगामात ‘हाय-रिस्क’ गेम हेच त्यांचे मुख्य बलस्थान राहिले आहे. या अति-आक्रमकतेमुळे ते काही सामन्यांत अडचणीत आले, पण विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, टिम डेव्हिड, कर्णधार रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर यांनी एकाच गियरमध्ये फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे. खेळपट्टीचे स्वरूप किंवा प्रतिस्पर्ध्यांची रणनीती, कशाचीही पर्वा न करता आरसीबीच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. चालू हंगामात सर्वाधिक वेळा 200 हून अधिक धावा फटकावण्याचा विक्रमही आरसीबीच्याच नावावर आहे.

गुजरातच्या फलंदाजीची धुरा त्रिमूर्तीवर

शुभमन गिल, साई सुदर्शन व बटलर या गुजरातच्या त्रिकुटाने आतापर्यंत सातत्याने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. शुभमन गिल (163 च्या स्ट्राईक रेटने 722 धावा), साई सुदर्शन (159 च्या स्ट्राईक रेटने 710 धावा) आणि जोस बटलर (157 च्या स्ट्राईक रेटने 507 धावा) यांना आजच्या निर्णायक लढतीत बहारदार फॉर्मची आणखी एकदा प्रचिती आणून द्यावी लागेल. गुजरातसाठी दिलासादायक बाब म्हणजे, चालू हंगामात त्यांच्या घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तम असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत.

मोहम्मद सिराजच्या दुखापतीची चिंता

या महामुकाबल्यापूर्वी गुजरातचे लक्ष वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या फिटनेसवर असेल. शुक्रवारी मुलानपूर येथे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दुसर्‍या क्वालिफायर सामन्यादरम्यान सिराजच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याने आपल्या कोट्यातील 4 ओव्हर्स पूर्ण केल्या असल्या तरी तो प्रचंड वेदनेत दिसत होता. ही दुखापत गंभीर नसावी, अशीच आशा गुजरातचा संघ करत असेल.

इतिहास रचण्याची आरसीबीला संधी

टी-20 मधील कमालीची अनिश्चितता पाहता जेतेपदासाठी आरसीबी व गुजरातचे संघ सर्वस्व पणाला लावतील. तूर्तास, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनंतर सलग दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा तिसरा संघ बनण्याची सुवर्णसंधी ‘रेड अँड गोल्ड’ ब्रिगेड अर्थात आरसीबीकडे असणार आहे. दुसरीकडे, कोणत्याही दडपणाला न जुमानणारा गुजरात टायटन्सचा संघ आरसीबीला धक्का देण्यासाठी सज्ज आहे. यामुळे हा अंतिम सामना कमालीचा रोमांचक होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT