टीम डेव्हिड 70 धावा 
स्पोर्ट्स

RCB vs CSK | ‘आरसीबी’चा चेन्नईवर धडाकेबाज विजय

डेव्हिड, पडिक्कलची अर्धशतके; पाटीदारचीही फटकेबाजी

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर; वृत्तसंस्था : टीम डेव्हिड (25 चेंडूंत 70 धावा), कर्णधार रजत पाटीदार (19 चेंडूंत नाबाद 48) आणि देवदत्त पडिक्कल (29 चेंडूंत 50 धावा) या त्रिकुटाने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) रविवारी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 43 धावांनी धमाकेदार विजय नोंदवला. प्रारंभी, निर्धारित 20 षटकांत 3 बाद 250 धावांचा डोंगर रचल्यानंतर ‘आरसीबी’ने चेन्नई सुपर किंग्जला 19.4 षटकांत सर्वबाद 207 धावांवर रोखले.

विजयासाठी 251 धावांचे तगडे आव्हान असताना चेन्नईतर्फे सर्फराज खान 25 चेंडूंत 50 व प्रशांत वीरने 29 चेंडूंत 43 धावा केल्या, तर ओव्हर्टनने 16 चेंडूंत जलद 37 धावा चोपल्या. मात्र, अन्य फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत राहिल्याने चेन्नईचा संघ विजयापासून दूरच राहिला.

तत्पूर्वी, पडिक्कल आणि टीम डेव्हिड यांनी चिन्नास्वामी स्टेडियमवर चौफेर फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसे काढली. कर्णधार रजत पाटीदारने केवळ 19 चेंडूंत नाबाद 48 धावा कुटत ‘आरसीबी’ला अडीचशेचा टप्पा गाठून दिला. यादरम्यान भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा पहिला जलद गोलंदाज ठरला.

डावातील 19 व्या षटकात चोपल्या 30 धावा!

‘आरसीबी’च्या टीम डेव्हिडने ओव्हर्टनच्या डावातील 19 व्या षटकात 4 षटकार व एका चौकारांसह एकूण 30 धावांची लयलूट केली. डेव्हिड व पाटीदार यांनी यादरम्यान चौथ्या गड्यासाठी अवघ्या 37 चेंडूंत 99 धावांची अभेद्य भागीदारीही साकारली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT