बेंगळुरू : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे, परंतु त्यापूर्वीच 'रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू' (RCB) संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसल्याने, या हंगामातील त्याच्या सहभागावर टांगती तलवार आहे.
जोश हेझलवूड सध्या तंदुरुस्तीच्या समस्यांशी झुंज देत असून, शनिवारी २८ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. नोव्हेंबरमध्ये न्यू साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया यांच्यातील शेफील्ड शिल्ड सामन्यानंतर हेझलवूड एकही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. दुखापतीमुळेच त्याला २०२५-२६ च्या मानाच्या 'ॲशेस' मालिकेलाही मुकावे लागले होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या टी-२० विश्वचषक संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या अवघ्या पाच दिवस आधी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथचा संघात समावेश करण्यात आला, परंतु प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान गट साखळीतच संपुष्टात आले. गेल्या काही महिन्यांपासून हेझलवूड हॅमस्ट्रिंगच्या समस्यांनी त्रस्त आहे.
'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, हेझलवूड सध्या फिजिओंच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे. आयपीएलमधील त्याचा सहभाग पूर्णपणे 'मेडिकल क्लीअरन्स'वर अवलंबून असेल. सध्यातरी आरसीबी व्यवस्थापन ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे. हेझलवूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांत मिळून आतापर्यंत ५१६ बळी घेतले आहेत.
बीसीसीआयने ११ मार्च रोजी आयपीएल २०२६ च्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध केले जाईल.
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्निल सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, मंगेश यादव, जॅकब डफी, सात्विक देसवाल, जॉर्डन कॉक्स, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, विकी ओस्तवाल.
२८ मार्च : आरसीबी विरुद्ध एसआरएच : सायं. ७:३० : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
५ एप्रिल : आरसीबी विरुद्ध सीएसके : सायं. ७:३० : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू
१० एप्रिल : आरआर विरुद्ध आरसीबी : सायं. ७:३० : बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी
१२ एप्रिल : एमआय विरुद्ध आरसीबी : सायं. ७:३० : वानखेडे स्टेडियम, मुंबई