अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचे जेतेपद पटकावत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (आरसीबी) दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या विजयासोबतच वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडचा व्हाईट बॉल फॉरमॅटमधील अंतिम सामन्यांतील विजयी सिलसिला आजही कायम आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीसमोर गुजरात टायटन्सचे आव्हान होते. गुजरातने दिलेल्या १५६ धावांचे माफक लक्ष्य आरसीबीने सहज गाठले. या ऐतिहासिक विजयात जोश हेजलवुडने आपल्या अचूक गोलंदाजीने मोलाची भूमिका बजावली. हेजलवुडच्या कारकीर्दीतील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अंतिम सामन्यांतील विजयाचा हा ८ वा प्रसंग असून, त्याने पुन्हा एकदा आपण ‘बिग मॅच विनर’ असल्याचे सिद्ध केले आहे.
जोश हेजलवुडचा व्हाईट बॉल टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात विजय मिळवण्याचा प्रवास २०१२ च्या चॅम्पियन्स लीग टी-२० पासून सुरू झाला. त्यानंतर २०१५ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. बिग बॅश लीग २०२० मध्येही त्याच्या संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. यानंतर टी-२० विश्वचषक २०२१ आणि २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघातही हेजलवुडचा समावेश होता. आयपीएलचा विचार करता, २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद मिळवले तेव्हाही त्याने निर्णायक कामगिरी केली होती. आता २०२५ आणि २०२६ अशा सलग दोन हंगामांत आरसीबीला चॅम्पियन बनवण्यात हेजलवुडचा सिंहाचा वाटा असून, अंतिम सामन्यांतील त्याच्या विजयाची टक्केवारी क्रिकेट विश्वात अतुलनीय ठरली आहे.
गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोश हेजलवुडने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३७ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी टिपले. २०२६ च्या संपूर्ण हंगामाचा आढावा घेतला तर, हेजलवुडने १३ सामन्यांत ५१.३ षटके गोलंदाजी केली. यात त्याने ३२.९३ च्या सरासरीने एकूण १५ बळी मिळवले. या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने १५ व्या क्रमांकावर मजल मारली असली, तरी अंतिम सामन्यातील त्याच्या प्रभावी कामगिरीने आरसीबीच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला.