नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने शनिवारी तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून ती असहाय लोकांना मदत करू शकेल.
रिवाबा म्हणाली, 'देवाच्या कृपेने, मला शरीरात आवश्यक असणारे सर्व अवयव आहेत आणि म्हणूनच दृष्टिबाधित लोकांचे दुखणे मला समजू शकत नाही. पण जर मी त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करू शकले तर ते माझ्यासाठी सन्मानाचे ठरेल. धडधाकट लोकांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे असेही तिने आवाहन केले आहे.
या क्षणी मला काय वाटते ते मी सांगू शकत नाही. परंतु, माझ्यासाठी हा अत्यंत समाधानाचा क्षण आहे. म्हणूनच, तुम्ही सर्वांनी इतरांना मदत करा, असे आवाहन रिवाबाने केले आहे.
रिवाबाचा पती रवींद्र जडेजा सध्या आयपीएल खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आहे. रवींद्र हा चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे.