स्पोर्ट्स

Ashwin vs Hardik Pandya : अश्विन पंड्यावर भडकला, म्हणाला ‘तू MI चा कर्णधार की CSKचा मदतनीस...’

MI vs CSK IPL 2026 : रोहित शर्माची जागा घेण्याचे 'भावनिक ओझे' हार्दिकला नडले

रणजित गायकवाड

मुंबई : आयपीएल २०२६ च्या हंगामात वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (CSK) मिळालेल्या १०३ धावांच्या मानहानीकारक पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारताचा माजी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने हार्दिकच्या नेतृत्वावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले असून, त्याच्या काही रणनीतिक निर्णयांना मुंबईच्या पराभवासाठी जबाबदार धरले आहे.

टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय चुकीचा?

अश्विनने आपल्या 'अश की बात' या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हार्दिकच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, "हार्दिकच्या निर्णयामुळे मी थोडा निराश झालो आहे. या स्पर्धेत ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे, त्यांनाच विजय मिळाला आहे, हे माहीत असतानाही हार्दिकने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबईने आरसीबीविरुद्धच्या सामन्यातही अशीच चूक केली होती आणि २४० धावांचे लक्ष्य गाठताना त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता."

अश्विनच्या मते, खेळपट्टी दुसऱ्या डावात अधिक संथ होत असताना प्रतिस्पर्ध्याला प्रथम फलंदाजी देणे म्हणजे त्यांना आयती संधी देण्यासारखे होते. चेन्नईकडून संजू सॅमसनने ५४ चेंडूत नाबाद १०१ धावांची खेळी करत मुंबईसमोर २०८ धावांचे लक्ष्य ठेवले, ज्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव अवघ्या १०४ धावांत आटोपला.

अनुभवी कर्णधाराने जबाबदारी झटकली?

सामन्याच्या शेवटच्या षटकांत हार्दिकने घेतलेल्या निर्णयावरही अश्विनने कडक शब्दात टीका केली. चेन्नईच्या डावातील शेवटचे षटक नवख्या कृष भगतला देण्याचा निर्णय अश्विनला रुचलेला नाही. "कृष भगतकडे अनुभवाची कमतरता आहे. दुसरीकडे हार्दिकने स्वतः टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन सारख्या फलंदाजांना गोलंदाजी केली आहे. अशा दबावाच्या प्रसंगी कर्णधाराने स्वतः पुढाकार घेऊन गोलंदाजी करायला हवी होती. जास्तीत जास्त काय झाले असते? धावा गेल्या असत्या, पण ती जबाबदारी कर्णधाराची होती," असे अश्विनने नमूद केले.

रोहित शर्माची जागा घेण्याचे 'भावनिक ओझे'

हार्दिकच्या कामगिरीवर आणि त्याला मिळणाऱ्या वागणुकीवर बोलताना अश्विनने सहानुभूतीही व्यक्त केली. गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवल्यानंतर हार्दिक पुन्हा ट्रेडद्वारे मुंबईत आला आणि त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवण्यात आले. या निर्णयामुळे चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले. अश्विन म्हणाला, "रोहित शर्मासारख्या महान खेळाडूची जागा घेणे आणि स्वतःच्याच घरच्या मैदानावर प्रेक्षकांकडून हुर्यो (Booing) ऐकणे हे कोणत्याही खेळाडूसाठी मोठे भावनिक ओझे असते. हार्दिकला माहीत आहे की विजय कसा मिळवायचा, पण सध्याची परिस्थिती हाताळणे हे त्याच्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे."

मुंबई इंडियन्स सध्या गुणतालिकेत सात सामन्यांत केवळ चार गुणांसह आठव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. आता २९ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ पुनरागमन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT