पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट म्हटलं की, दिग्गज फलंदाजांबरोबरच फिरकीपटूंच्या योगदानाचे स्मरण होतेच. बिशन सिंग बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर ते अनिल कुंबळे अशी फिरकीपटूंची एक मोठी परंपरा भारतीय क्रिकेटला लाभली आहे. आपल्या फिरकीने जगभरातील भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवत आर. अश्विन ( Ravichandran Ashwin) यानेही भारतातील दिग्गज फिरकीपटूंच्या यादीत अढळ स्थान निर्माण केलं हाेतं. ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सुरु असतानाच आज (दि.१८) त्याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तब्बल १४ वर्ष त्याने भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान हे वादातीत आहे. जाणून घेवून त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारर्किदीविषयी....
२ जून २०१० रोजी हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 मध्ये, ५ जून २०१० रोजी हरारे येथे श्रीलंकेविरुद्ध वन-डे तर न्यात, 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दिल्लीत कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा केला होता. कसोटीमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकणारा तो भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने तब्बल ११ वेळा प्लेयर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला आहे. अशी कामगिरी करत त्याने जगातील सर्वाधिक बळी घेणार्या श्रीलंकाचा फिरकीपटू मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मुरलीधरन योनही ११ वेळा 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कार पटकावला आहे. २०११ मध्ये भारतीय संघाने विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती. यासंघात अश्विनचा समावेश होता.
आर. अश्विनने अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. 106 कसोटीत 537 विकेट त्याच्या नावावर आहेत. ५९ धावांमध्ये सात बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली होती. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर ६१९ बळी आहेत.
अश्विन याने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल ३७ वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. फिरकीपटू अनिल बुळे याने ३५ डावांमध्ये पाच बळी घेतले होते. सर्वाधिक डावात पाच विकेट्स घेण्याचा एकूण विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. असे त्याने 67 वेळा केले. अश्विन शेन वॉर्नसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे.
१०६ कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी योगदान देणार्या आर. अश्विने ११६ कसोटी आणि ६५ टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने १५६ तर आणि टी-20मध्ये 72 विकेट घेतल्या आहेत. वन-डेमधील त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी २५ धावांमध्ये चार विकेट अशी आहे. तर टी-20 मध्ये आठ धावांत चार विकेट्स ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. उत्कृष्ट गोलंदाजीबरोबर त्याने आपण एक उत्कृष्ट फलंदाज असल्याचेही वारंवार सिद्ध केलेहोते. कसोटीत त्याच्या नावावर २५.७५ सरासरीने ३५०३ धावा आहेत. अश्विनच्या नावावर कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १२४ धावांची आहे. त्याने सहा शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. याशिवाय वन-डे सामन्यात 16.44 च्या सरासरीने 707 धावा आणि टी20 मध्ये 114.99 च्या स्ट्राईक रेटने 184 धावा केल्या आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी आर. अश्विन फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याचा आपल्या संघात समावेश केला आहे.
आयपीएलच्या २०१९ मधील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबच कर्णधार असताना रवीचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला 'मंकड स्टाइल' धावबाद केले होते. काहींना अश्विनला पाठिंबा दर्शविला असून, काहींना त्याचा हा निर्णय म्हणजे खिलाडूवृत्ती नसल्याचे म्हटले आहे. यामुळे क्रिकेटजगत दोन गटांत विभागले गेले होते.