Rashid Khan New record
नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा कर्णधार आणि फिरकीपटू राशिद खानने आज (दि. १६) सोमवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. टी-२० क्रिकेटच्या स्वरूपात ७०० बळींचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. या प्रकारात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आधीच राशिदच्या नावावर होता.
युएई विरुद्धच्या सामन्यात राशिद खानने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २४ धावा देत १ बळी घेतला. युएईच्या मुहम्मद अरफानला बाद करताच राशिदने ७०० टी-२० बळींचा आकडा पूर्ण केला. दरम्यान, राशिद खान सध्या १९१ आंतरराष्ट्रीय बळींसह अव्वल स्थानी आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा टिम साऊदी (१६४ बळी) आणि तिसऱ्या स्थानावर ईश सोढी (१६२ बळी) आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मधील २८ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि युएई दरम्यान खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युएईने २० षटकांत ९ बाद १६० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने १९.२ षटकांत ५ बाद १६२ धावा करत ५ गडी राखून विजय मिळवला.ग्रुप 'डी' मध्ये असलेल्या अफगाणिस्तानचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय आहे. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या विजयामुळे अफगाणिस्तानचे 'सुपर-८' फेरी गाठण्याचे आव्हान अद्याप जिवंत आहे.