पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy : विदर्भ क्रिकेट संघाने 2024-25 मध्ये रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नागपूरमध्ये खेळला गेलेला विदर्भ विरुद्ध केरळ हा अंतिम सामना अनिर्णित राहिला. पण पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भ संघाला विजेता घोषित करण्यात आले. अशाप्रकारे विदर्भाने तिस-यांदा रणजी करंडक चषकावर नाव कोरले. दरम्यान, यंदाच्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा, सर्वाधिक विकेट्स आणि इतर प्रमुख आकडेवारीवर एक नजर टाकूया.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने दानिश मालेवारच्या शानदार शतक (153) आणि करुण नायरच्या (86) उत्कृष्ट खेळीच्या जोरावर 379 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, सचिन बेबी (98) आणि आदित्य सरवटे (79) यांच्या खेळीमुळे केरळने 342 धावा केल्या.
दुसऱ्या डावात, करुण नायरची बॅट पुन्हा तळपली. त्याने 135 धांवांची धमाकेदार इनिंग खेळली. त्याचबरोबर दानिशनेही (73) अर्धशतक फटकावले. पाचव्या दिवसाच्या खेळादरम्यान, विदर्भाने दुसऱ्या डावात 9 बाद 375 धावा केल्या. यासह त्यांनी एकूण 412 धावांची आघाडी घेतली. यानंतर 40 पेक्षा कमी षटकांमध्ये 412 धावांचे लक्ष्य मिळालेल्या केरळने शेवटच्या दिवशी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करून सामना बरोबरीत ठेवण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या रणजी हंगामात यश राठोड सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विदर्भाच्या या फलंदाजाने 18 डावांमध्ये 53.33 च्या सरासरीने 960 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सर्वाधिक 5 शतके आणि 3 अर्धशतके झळकली. मध्य प्रदेशच्या शुभम शर्माने 12 डावात 104.77 च्या सरासरीने 943 धावा केल्या. या काळात त्याने 3 शतके आणि 4 अर्धशतके फटकावली. हैदराबादच्या तन्मय अग्रवालने 12 डावात 77.83 च्या सरासरीने 934 धावा केल्या.
विदर्भाचा अनुभवी फलंदाज करुण नायरने 9 सामन्यांच्या 16 डावात 53.93 च्या सरासरीने 863 धावा केल्या. यामध्ये 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तो सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याच्यापेक्षा जास्त शतके फक्त राठोडच्या बॅटमधून आली. तर तन्मय अग्रवाल आणि उत्तर प्रदेशच्या आर्यन जुयाल यांनी प्रत्येकी 4-4 शतके फटकावली. उत्तराखंडच्या समर्थ अग्रवालने सर्वाधिक 6 अर्धशतके केली.
विदर्भाच्या यश दुबेने 19 डावात 16.98 च्या सरासरीने 69 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला 50 विकेट्सचा टप्पा गाठता आला नाही. जम्मू आणि काश्मीरच्या आकिब नबीने 15 डावात 13.93 च्या सरासरीने 44 तर मुंबईच्या शम्स मुलानीने 18 डावांमध्ये 23.52 च्या सरासरीने 44 विकेट्स घेण्यात यश आले. सौराष्ट्राच्या धर्मराज जडेजाने 40 बळी मिळवले.
दुबेने 7 डावात सर्वाधिक वेळा 5 बळी घेण्याची किमया केली. त्यानंतर आकिबचा क्रमांक लागतो. त्याने 6 डावात 5 बळी घेतले.
हरियाणाच्या 23 वर्षीय अंशुल कंबोजने एका डावात 10 बळी घेण्याचा विक्रम केला. त्याने केरळविरुद्ध खेळताना पहिल्या डावात 49 धावांत सर्व 10 फलंदाजांना तंबूत पाठवले. यासह तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला. त्यांच्या आधी बंगाल क्रिकेट संघाचे प्रेमांशु चॅटर्जी यांनी 1956 मध्ये आसाम विरुद्ध खेळताना 20 धावांत 10 बळी घेतले होते. तर राजस्थान क्रिकेट संघाचे प्रदीप सुंदरम यांनी 1985 मध्ये विदर्भ विरुद्ध 78 धावा देऊन 10 विकेट्स मिळवल्या होत्या. दरम्यान, अनिल कुंबळे, सुभाष गुप्ते आणि देबाशिष मोहंती हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (डावांमध्ये) 10 बळी घेणारे इतर भारतीय गोलंदाज आहेत. कंबोज व्यतिरिक्त यंदाच्या हंगामात गुजरातच्या सिद्धार्थ देसाईने उत्तराखंडविरुद्धच्या डावात 9 विकेट्स घेतल्या.