स्पोर्ट्स

Ranji Trophy 2022 : सर्फराजचे शतक

Arun Patil

बंगळूर ; वृत्तसंस्था : सर्फराज खानच्या शतकी खेळीच्या जोरावर रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईने दुसर्‍या दिवशी मध्य प्रदेशविरुद्ध चांगल्या धावा केल्या. पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी त्यांचा निम्मा संघ 248 धावांवर माघारी परतला होता; पण गुरुवारी सर्फराज खान पुन्हा एकदा मुंबईसाठी संकटमोचक ठरला. मधल्या फळीतील या फलंदाजाने 243 चेंडूंत 134 धावांची महत्त्वाची खेळी करताना मुंबईला पहिल्या डावात 374 धावांचा पल्ला गाठून दिला. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने दिवसअखेरीस 1 बाद 123 धावा केल्या होत्या. ते अजून 251 धावांनी पिछाडीवर आहेत.

41 जेतेपदे नावावर असलेल्या मुंबईला पृथ्वी (47) व यशस्वी जैस्वाल (78) यांनी चांगली सुरुवात करून दिली; परंतु मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनी कमबॅक केले. मात्र, सर्फराज खिंड लढवत राहिला. पहिल्या दिवशी 40 धावांवर नाबाद राहिलेल्या सर्फराजने आज चांगली फटकेबाजी केली. त्याने 190 चेंडूंत 11 चौकारांसह शतक पूर्ण केले. ही शतकी खेळी केल्यानंतर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

सर्फराजने रणजी करंडक स्पर्धेतील मागील 16 डावांमध्ये 1 तिहेरी शतक, दोन द्विशतके, 3 वेळा 150 हून अधिक धावसंख्या, आता अंतिम सामन्यात एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. रणजी करंडक 2021-22 मध्ये त्याने सर्वाधिक 937 धावा केल्या आणि मागच्या वर्षीचा स्वतःचाच 928 धावांचा विक्रम मोडला. त्याने पुन्हा एकदा विनोद कांबळीचा 880 (1997-98) आणि दिलीप वेंगसरकर 869 (1990-91) यांचा विक्रम मोडला.

दरम्यान, पृथ्वीने 79 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 47 धावांची खेळी केली. त्यानंतर मध्य प्रदेशने टप्प्याटप्प्याने मुंबईला धक्के दिले. अरमान जाफर (26) व सुवेध पारकर (18) यांच्या अपयशाने मुंबईची डोकेदुखी वाढवली होती; पण यशस्वी खिंड लढवत होता. तो 163 चेंडूंचा सामना करून 7 चौकार 1 षटकार खेचून 78 धावांवर बाद झाला. सर्फराज व हार्दिक तामोरे यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सारांश जैनने ही भागीदारी तोडली. तामोरे 24 धावांवर बाद झाला.

शड्डू ठोकून सेलिब्रेशन

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक पूर्ण करताना मुंबईचा फलंदाज सर्फराज खान भावुक झाला होता. शतक साजरे करताना 23 वर्षीय फलंदाज हेल्मेट काढताना रडताना दिसला. त्यानंतर त्याने शिखर धवन स्टाईलने शड्डू ठोकून आनंद साजरा केला. या वर्षाच्या रणजी हंगामातील हे त्याचे चौथे आणि प्रथम श्रेणीतील आठवे शतक ठरले. मुंबईचा फलंदाज सर्फराज खान यंदाच्या रणजी करंडकमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

त्याने या वर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेतील शेवटच्या तीन साखळी सामन्यांमध्ये 165, 63, 48 अशा धावा केल्या होत्या. शिवाय, मुंबईविरुद्ध उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यातही त्याने 154 धावा केल्या होत्या. गेल्या रणजी हंगामात त्याने एकूण 928 धावा केल्या होत्या. प्रत्येक प्रथम श्रेणीतील शतकामध्ये 150 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या हंगामामध्येदेखील सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने आपली क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.

SCROLL FOR NEXT