पुढारी ऑनलाईन डेस्क : ९ एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्सकडून ५८ धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर राजस्थान संघाची अवस्था आणखी बिकट झाली आहे. ते ५ सामन्यांत २ विजय आणि ३ पराभवांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहेत. या पराभवानंतर संजू सॅमसन आणि राजस्थान संघाच्या खिशालाही फटका बसला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या आयपीएल २०२५ च्या २३ व्या सामन्यात संजू सॅमसनला त्याच्या संघाने स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल दंड ठोठावला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत या हंगामात त्याच्या संघाचा तीच चुक दुसऱ्यांदा केली. म्हणून सॅमसनला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
आयपीएलने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ च्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या संघाने स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, तो त्याच्या संघाचा हंगामातील दुसरा गुन्हा असल्याने, सॅमसनला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. निवेदनात असेही म्हटले आहे की, 'इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित प्लेइंग इलेव्हनला ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के, जे कमी असेल ते दंड आकारला जाईल.'
नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्या क्रमांक २३ मध्ये गुजरात संघाने ५८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरातकडून साई सुदर्शनने ५३ चेंडूत ८२ धावांची धमाकेदार खेळी केली. सुदर्शनच्या खेळीत ३ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. अशाप्रकारे गुजरातने २१७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला या सामन्यात पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत आणि त्यांचा डाव १९.२ षटकांत १५९ धावांवर संपला. शिमरॉन हेटमायर (५२), संजू सॅमसन (४१) आणि रियान पराग (२६) व्यतिरिक्त, राजस्थानकडून इतर कोणताही फलंदाज एकेरी अंकाचा टप्पा ओलांडू शकला नाही. या सामन्यातील विजयासह, गुजरात संघ ५ सामन्यांत ४ विजय आणि १ पराभवासह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान संघ आता पाच सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभवांसह सातव्या स्थानावर आहे.