राजस्थानचे आव्हान कायम Pudhari File Photo
स्पोर्ट्स

RR vs GT : राजस्थानचे आव्हान कायम

गुजरात टायटन्सवर 8 विकेटस्नी विजय

पुढारी वृत्तसेवा

जयपूर; वृत्तसंस्था : इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा 47 वा सामना 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने गाजवला. त्याने 35 चेंडूंत शतक ठोकत राजस्थान रॉयल्सला गुजरात टायटन्सविरुद्ध 8 विकेटस्ने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सोमवारी (28 एप्रिल) जयपूरला झालेल्या या सामन्यात राजस्थानने विजय मिळवल्याने त्यांचे प्ले ऑफ शर्यतीतील आव्हान अजूनही जिवंत राहिले आहे. हा राजस्थानचा 10 सामन्यांतील तिसरा विजय आहे.

या सामन्यात गुजरातने राजस्थानसमोर 210 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थान रॉयल्सने 15.5 षटकांत 2 विकेटस्च गमावत 212 धावा करून पूर्ण केले. (RR vs GT) वैभवसोबतच यशस्वी जैस्वालचे योगदान महत्त्वाचे राहिले. त्यानेही अर्धशतक ठोकले.

या सामन्यात राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामीला फलंदाजी केली. वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याला दुसर्‍या बाजूने यशस्वी जैस्वाल चांगली साथ देत होता. वैभवने 17 चेंडूंत अर्धशतक केले. त्यानंतरही तो थांबला नाही. त्याने नंतरही गुजरातच्या सर्वच गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळताना 35 चेंडूंत शतक ठोकले.

हे वैभवचे पहिले शतक तर आहेच, पण तो आयपीएल आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू ठरला. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजही ठरला. त्याच्या खेळामुळे राजस्थानसाठी विजय सोपा झाला, पण शतकानंतर त्याला 12 व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने त्रिफळाचीत केले. त्याने 38 चेंडूंत 101 धावांची खेळी केली. यात त्याने 7 चौकार आणि 11 षटकार मारले. (RR vs GT)

तो बाद झाल्यानंतर नितीश राणाही 13 व्या षटकात 4 धावांवर राशीद खानविरुद्ध पायचीत झाला, पण नंतर जैस्वालला राजस्थानचा कर्णधार रियान परागने चांगली साथ दिली. जैस्वालनेही अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनीही नंतर राजस्थानचा विजय निश्चित केला. यशस्वी जैस्वाल 40 चेंडूंत 70 धावांवर नाबाद राहिला. त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. रियान परागने नाबाद 32 धावा केल्या.

तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 50 चेंडूंत 84 धावांची खेळी केली, तर जोस बटलरने 26 चेंडूंत 50 धावांची खेळी केली. साई सुदर्शनने 30 चेंडूंत 39 धावा केल्या. त्यामुळे गुजरातने 20 षटकांत 4 बाद 209 धावा केल्या. राजस्थानकडून गोलंदाजी करताना महिश तिक्षणाने 2 विकेटस् घेतल्या, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT