मुल्लानपूर; वृत्तसंस्था : यंदाच्या हंगामात पहिल्या 7 सामन्यांत एकही पराभव न पत्करलेल्या पंजाब किंग्जचा अश्वमेघ अखेर राजस्थान रॉयल्सने रोखून धरण्याचा पराक्रम गाजवला आणि यामुळे पंजाबला या हंगामातील आपल्या पहिल्यावहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत पंजाबने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 222 धावांचा डोंगर रचत येथेही विजयाची बेगमी जवळपास क रून ठेवली होती. मात्र, वैभव सूर्यवंशी (16 चेंडूत 43) व यशस्वी जैस्वाल (27 चेंडूत 51) यांच्या फ्लाईंग स्टार्टनंतर डोनोव्हन फेरेरा (26 चेंडूंत 52) व शुभम दुबे (12 चेंडूंत 31) यांची फटकेबाजी येथे अवतरली आणि राजस्थानने 19.2 षटकांत 4 बाद 228 धावांसह दणकेबाज विजय साकारला.
प्रारंभी, मुल्लानपूरच्या मैदानावर मार्कस स्टॉयनिस नावाचे वादळ घोंघावले. त्याने 22 चेंडूंच्या नाबाद 62 धावांच्या खेळीत 6 उत्तुंग षटकार आणि 4 खणखणीत चौकार ठोकले. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने 44 चेंडूंत 59 धावांची खेळी करत डावाचा पाया रचला. त्याला प्रियांश आर्य (11 चेंडूंत 29 धावा) आणि कूपर कोनोली (14 चेंडूंत 30 धावा) यांनी मोलाची साथ दिली.
राजस्थानचा नवोदित गोलंदाज ब्रिजेश शर्माच्या डावाच्या अंतिम षटकात स्टॉयनिसने अक्षरशः धुमाकूळ घालत 24 धावा वसूल केल्या. ब्रिजेशने वापरलेली ‘पेस-ऑफ’ची रणनीती स्टॉयनिसने फोल ठरवली. अनुभवी गोलंदाजांच्या अभावी राजस्थानची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी पूर्णपणे विखुरलेली दिसली. अखेर पंजाबने 4 बाद 222 धावांपर्यंत मजल मारली.
राजस्थानने शेवटच्या 18 चेंडूंत बहाल केल्या 55 धावा!
राजस्थानच्या गोलंदाजीची दुर्दशा शेवटच्या तीन षटकांत प्रकर्षाने दिसून आली. या 3 षटकांत राजस्थानने तब्बल 55 धावा बहाल केल्या, हा देखील एक विक्रम ठरला.