स्पोर्ट्स

IND vs NZ 2nd ODI : दुसर्‍या वन-डेवर पावसाचे सावट, विराटपाठोपाठ रोहितही बहरात येण्‍याची अपेक्षा

गोलंदाजीत अननुभवी जलद त्रिकुटावर भारताची भिस्‍त

रणजित गायकवाड

वेलिंग्‍टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज (दि. ७) होणार्‍या दुसर्‍या वन-डे सामन्‍यात खराब हवामान, पावसाचा व्यत्यय येण्‍याची शक्‍यता स्‍थानिक हवामान खात्‍याने नोंदवली आहे. सामना होऊ शकल्‍यास भारताची गोलंदाजीतील भिस्‍त पुन्‍हा एकदा गुरनूर ब्रार, अंशुल कंबोज आणि अर्शदीप सिंग या अननुभवी त्रिकुटावर असेल. याशिवाय, फलंदाजीत विराटपाठोपाठ रोहित शर्मानेही बहरात येणे अपेक्षित असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता या लढतीला सुरुवात होईल.

ॲकुवेदरच्या हवामान अंदाजानुसार, शनिवारी दुपारी वेलिंग्टनमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या पावासाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तर संध्याकाळच्या सुमारास वातावरण अंशतः ढगाळ राहून हलका पाऊस पडू शकतो.

यापूर्वी पहिल्‍या वन-डेत भारताच्या गोलंदाजीच्या ताकदीबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते; परंतु पहिल्या सामन्यातील अप्रतिम कामगिरीच्या जोरावर गुरनूर, अंशुल कंबोज आणि अर्शदीप या त्रिकुटाने ते चित्र पूर्णपणे बदलून टाकले. या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीवरून आतापर्यंत अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देणाऱ्या मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या धोरणातही काहीसा बदल होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मालिकेची पार्श्वभूमी

ऑकलंड येथे खेळला गेलेला पहिला वन-डे सामना पावसामुळे बाधित झाल्याने ३२ षटकांचा करण्यात आला होता, यामध्ये भारताने ५ गडी राखून विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळवला जाईल, तर शेवटचे दोन सामने १३ आणि १५ नोव्हेंबर रोजी माऊंट माऊंगानुई येथे पार पडतील. त्यानंतर १९ नोव्हेंबरपासून बेसिन रिझर्व्ह येथे दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

आजचा सामना

  • भारतीय प्रमाणवेळ : सकाळी ७.३० वा.

  • थेट प्रक्षेपण : सोनी स्‍पोर्टस्‌ नेटवर्क

भारताचे सराव सत्र रद्द, तर न्‍यूझीलंडचा इनडोअर सराव

‘हेन्री स्टेडियम’वरील या महत्त्वपूर्ण सामन्यात खराब हवामानाचा व्‍यत्‍यय येण्याची शक्‍यता असल्‍याने याबाबत मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रतिकूल हवामानामुळे भारताचे शुक्रवारी बेसिन रिझर्व्ह येथील नियोजित सराव सत्र रद्द करण्यात आले, तर न्यूझीलंडच्या संघाने इनडोअर सुविधेत सराव केला.

कॉनवे मालिकेतून बाहेर, न्‍यूझीलंडला आणखी एक धक्‍का

सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा प्रमुख फलंदाज डेव्हन कॉनवे हा सराव सत्रादरम्यान झालेल्या क्षेत्ररक्षणातील एका दुर्दैवी धडकेत मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे (कन्कशन) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. आधीच व्यस्त वेळापत्रक आणि खेळाडूंच्या दुखापतींशी सामना करणाऱ्या किवी संघासाठी हा एक मोठा धक्का आहे. दरम्यान, या घटनेत सामील असलेला दुसरा खेळाडू मॅट हेन्री पूर्णपणे बरा झाला असून, तो या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

कशी असेल खेळपट्टी?

ऑकलंडमधील ईडन पार्क मैदानावर सरळ सीमा (स्ट्रेट बाऊंड्रीज) लहान होत्या; मात्र वेलिंग्टनमधील ‘हेन्री स्टेडियम’वर चौकार-षटकारांच्या सीमा (स्क्वेअर बाऊंड्रीज) तुलनेने लहान असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना आपल्या टप्प्यात त्यानुसार योग्य ते बदल करावे लागतील. अर्शदीप आणि सहकाऱ्यांनी ऑकलंडमध्ये आपल्या अचूक माऱ्यामुळे विरोधकांना अडचणीत आणले होते. परंतु, येथील मैदानाची रचना पाहता गोलंदाजांना किंचित पुढे टप्पा टाकून गोलंदाजी करावी लागण्याची शक्यता आहे.

हेड टू हेड

  • एकूण सामने : १२३

  • भारत विजयी : ६३

  • न्‍यूझीलंड विजयी : ५२

  • टाय : १

  • निकाल नाही : ७

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT