भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वीनू मांकड करंडक स्पर्धेसाठी भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा धाकटा मुलगा अन्वय द्रविड याच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अन्वय या स्पर्धेत कर्नाटक संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयची ही महत्त्वपूर्ण स्पर्धा ९ ते १७ ऑक्टोबरदरम्यान देहरादून येथे खेळली जाईल.
१६ वर्षीय अन्वयने मागील वर्षी याच स्पर्धेत कर्नाटक राज्यासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. या वेळीही तो संघाच्या आघाडीच्या फळीत महत्त्वाची भूमिका पार पाडेल.
अलीकडच्या काळात अन्वयचा खेळ सातत्याने उत्कृष्ट राहिला आहे. १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक स्पर्धेत सलग दुसऱ्या हंगामात तो कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने सहा सामन्यांत ९१.८० च्या प्रभावी सरासरीने ४५९ धावा कुटल्या. यात दोन शतकांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (KSCA) रविवार, ५ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात अन्वयचा सत्कार केला.
राहुल द्रविड यांच्या क्रिकेट वारसाची ही परंपरा अन्वय पुढे चालवत आहे. त्याने ६ सामन्यांत ४८ चौकार-षटकारांच्या जोरावर ४५९ धावा आणि २ शतके झळकावली आहेत. अन्वयकडे कर्नाटकातील एक उदयोन्मुख यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून पाहिले जाते. यापूर्वीही त्याने विविध वयोगटातीक संघांचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याचा मोठा भाऊ आणि १९ वर्षीय समित यानेही यापूर्वी वीनू मांकड करंडक स्पर्धेत कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले आहे. समित अलीकडेच महाराजा टी२० लीगमध्ये खेळताना दिसला होता आणि तो कर्नाटकच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
अन्वय द्रविड (कर्णधार, यष्टीरक्षक), नितीश आर्य, आदर्श डी उर्स, एस मणिकांत (उपकर्णधार), प्रणीत शेट्टी, वासव वेंकटेश, अक्षत प्रभाकर, सी वैभव, कुलदीप सिंह पुरोहित, रतन बीआर, वैभव शर्मा, केए तेजस, अथर्व मालवीय, सनी कांची, रेहान मोहम्मद.