भारतीय नेमबाज राही सरनोबत.  Pudhari
स्पोर्ट्स

Rahi Sarnobat Asian Games 2026 : नेमबाज राही सरनोबतकडून दुर्मिळ आणि अनपेक्षित चूक; भारताला पदकाची हुलकावणी!

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारत पाचव्या स्थानी

पुढारी वृत्तसेवा

Rahi Sarnobat Asian Games 2026 : आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये आज (दि. २८) महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात अनुभवी नेमबाज राही सरनोबतकडून झालेल्या दुर्मिळ चुकीमुळे भारताच्या पदकाच्या आशा मावळल्या. चौथ्या शॉटवेळी झालेल्या अनपेक्षित चुकीचा फटका निर्णायक ठरला. भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडून पाचव्या स्थानावर फेकला गेला.

चौथ्या शॉटवेळी 'शून्य' गुण!

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्पर्धांचा समावेश होता. सांघिकमध्ये भारताने ईशा, मनू आणि सरनोबत या तीन अनुभवी नेमबाजांना मैदानात उतरवले. प्रत्येक शॉट महत्त्वाचा असलेल्या या स्पर्धेत चौथ्या शॉटवेळी राही सरनोबतला अनपेक्षित 'शून्य' गुण मिळाले.

राहीच्या नावावर ३९ गुण

अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत, जिथे पदक जिंकणाऱ्या संघांमधील गुणांचे अंतर खूप कमी होते, तिथे हा फटका विशेषतः नुकसानकारक ठरला. राहीच्या नावावर ३९ गुण नोंदवले गेले. अखेरीस, वैयक्तिक पात्रता फेरीत ५६८-१६x गुणांसह सरनोबत ३० व्या स्थानावर राहिली. वैयक्तिक प्रकारात तिच्या सहकारी खेळाडूंचे नशीब मात्र वेगळे ठरले. ईशाने ५८०-२२x गुणांसह आठव्या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली, तर मनू अवघ्या काही गुणांच्या फरकाने संधी हुकल्यामुळे ५७९-१८x गुणांसह ११ व्या स्थानावर राहिली.

भारतीय संघ चायनीज तैपेईपेक्षा ७ गुण मागे

भारताची अंतिम सांघिक गुणसंख्या १७२७-५६x इतकी होती. यामुळे संघ कांस्यपदक विजेत्या चायनीज तैपेईपेक्षा ७ गुण आणि रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियापेक्षा केवळ ८ गुण मागे राहिला. सुवर्णपदक जिंकणाऱ्या चिनी संघाच्या तुलनेत हे अंतर १६ गुणांचे होते. राहीच्या चौथ्या शॉटवेळच्या शून्य गुणांमुळे संघाच्या हातून निसटलेल्या संधींचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला.

असे घडण्याची ही पहिलीच वेळ : राही सरनोबत

आशियाई क्रीडा स्पर्धेत यापूर्वी राही सरनोबतने सुवर्णपदक जिंकले होते. यंदाही तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. आजच्या खेळाबाबत बोलताना राही सरनोबत म्हणाली की, "माझ्या कारकिर्दीत असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हे नक्की कसे घडले, हे मलाही समजत नाहीये."

पिस्तूल सांघिक प्रकारात चीनला सुवर्णपदक

ईशा सिंग, मनू भाकर आणि सरनोबत या भारतीय त्रिकुटाने सांघिक स्पर्धेत एकत्रितपणे १७२७-५६x गुण मिळवले. चीनने १७४३-६८x गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर दक्षिण कोरिया (१७३५-६५x) आणि चायनीज तैपेई (१७३४-४८x) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT