मँचेस्टर; वृत्तसंस्था : भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याच्यावर सडकून टीका केली आहे. मँचेस्टर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रवींद्र जडेजाला डिवचणार्या स्टोक्सच्या कृतीवर अश्विनने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘तुमच्या निराशेपोटी तुम्ही खेळभावनेला हरताळ फासू शकत नाही,’ अशा शब्दांत अश्विनने स्टोक्सला खडे बोल सुनावले आहेत.
मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी सामना अनिर्णीत अवस्थेत होता. भारताकडून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर अभेद्य भागीदारी करत शतकाच्या दिशेने वाटचाल करत होते. भारतीय फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंडचा संघ निराश झाला होता. याचवेळी कर्णधार स्टोक्सने सामना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण जडेजा आणि सुंदर शतकाच्या जवळ असल्याने भारताने खेळणे सुरूच ठेवले.
यामुळे चिडलेल्या स्टोक्सने जडेजाला डिवचण्याच्या हेतूने त्याच्याशी शाब्दिक बाचाबाची केली. स्टोक्सच्या या उद्धटपणावर अश्विनने आपल्या ‘अॅश की बात’ या यूट्यूब शोमध्ये जोरदार टीका केली. अश्विन म्हणाला, हा तर दुटप्पीपणा आहे. भारतीय फलंदाजांनी दिवसभर तुमच्या गोलंदाजांचा सामना केला आणि जेव्हा ते शतकाच्या जवळ आले, तेव्हा तुम्हाला सामना संपवायचा होता? त्यांनी का थांबावे? तुम्ही विचारता, ‘तुला हॅरीविरुद्ध शतक करायचे आहे?’ अरे भावा, त्याला शतक करायचेच आहे. तुम्ही ब्रूकला का आणता? हवं तर स्टीव्ह हार्मिसन किंवा अँड्र्यू फ्लिटाँफला निवृत्तीतून परत बोलवा, तरीही तो शतक करेल.
स्टोक्सने केवळ निराशेपोटी हे कृत्य केले असून, क्रिकेट कुणा एका व्यक्तीच्या मर्जीनुसार चालत नाही, असेही अश्विनने स्पष्ट केले. जडेजा आणि सुंदरने द्विशतकी भागीदारी करत इंग्लंडला दिवसभर यश मिळू दिले नाही, त्यामुळेच स्टोक्सने हा अनावश्यक वाद निर्माण केल्याचा आरोप अश्विनने केला आहे.