स्पोर्ट्स

R Ashwin : अश्विन BCCI वर भडकला, जैस्वालच्या मुद्द्यावरून निवड समितीवर थेट निशाणा; न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी संघनिवडीवरून नवा वाद

‘६ सामन्यांत २ शतकं तरीही संघातून बाहेर? हा कसला न्याय; तुम्ही त्याचा आत्मविश्वास संपवताय!’

रणजित गायकवाड

चेन्नई : भारतीय क्रिकेट संघासाठी आगामी न्यूझीलंड दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, या दौऱ्यात भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-२० संघ जाहीर केल्यानंतर १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेत सुरुवातीच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करणार आहे.

जाहीर करण्यात आलेल्या संघात काही मोठे बदल पाहायला मिळत असून, युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. त्याला केवळ दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान मिळाले आहे. निवड समितीच्या या आश्चर्यकारक निर्णयावर भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे युवा खेळाडूंचा आत्मविश्वास पूर्णपणे खचतो, असा थेट आरोप अश्विनने केला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या संघ निवडीनंतर अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून निवड समितीच्या भूमिकेवर परखड शब्दांत ताशेरे ओढले. जर शुभमन गिल शेवटचे दोन एकदिवसीय सामने खेळणार नव्हता, तर त्याच्या जागी निश्चितपणे यशस्वी जयस्वालला संघात स्थान मिळायला हवे होते, असे मत अश्विनने मांडले. निवड समितीचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, अशा अनिश्चिततेमुळे खेळाडूच्या मानसिकतेवर आणि आत्मविश्वासावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा त्याने दिला.

शुभमन गिल आणि के. एल. राहुल यांची संघातील स्थिती समजण्यासारखी असली, तरी जयस्वालला मैदानात उतरण्याची अजिबातच संधी मिळत नसल्याचे अश्विनने अधोरेखित केले. अश्विनच्या मते, सातत्याने बाहेर बसावे लागत असल्यामुळे जयस्वालचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून, तो दोन-तीन वर्षांपूर्वी ज्या निर्धास्तपणे फलंदाजी करत होता, तशी लय सध्या त्याच्या खेळात दिसत नाही. जयस्वाल हा सातत्याने धावा करणारा ‘रन मशीन’ खेळाडू असल्याने त्याचा फॉर्म कायम राखण्यासाठी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने त्याला जास्तीत जास्त संधी देणे गरजेचे होते; मात्र त्याला सातत्याने डावलले जाणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे अश्विनने म्हटले.

दरम्यान, यशस्वी जयस्वालच्या एकदिवसीय क्रिकेटमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने चमकदार कामगिरी नोंदवली आहे. भारताच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या अखेरच्या एकदिवसीय मालिकेत त्याने उत्कृष्ट शतक झळकावले होते. जयस्वालने आतापर्यंत खेळलेल्या ६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७१.२५ च्या दमदार सरासरीने २८५ धावा फटकावल्या असून, यात दोन शतकी खेळींचाही समावेश आहे. असे उत्कृष्ट आकडे असतानाही त्याला डावलण्यात आल्याने आता क्रिकेटविश्वातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT