बडोदा : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधून डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला वगळण्यात आल्याने क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आल्याने अर्शदीप भारतीय वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली. भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर प्रशासनाला धारेवर धरले आहे.
अर्शदीप सिंगला संघात असूनही खेळवण्यात न आल्याने अश्विनने 'X' वर आपली प्रतिक्रिया दिली. त्याने विचारले, "अर्शदीप सिंग कुठे आहे? बस एवढेच!" एका चाहत्याने त्याला उत्तर देताना म्हटले की, "अर्शदीप आगामी टी-२० विश्वचषक संघात असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली असावी."
मात्र, अश्विनने हा तर्क फेटाळून लावला. तो म्हणाला, "एखाद्या खेळाडूला विश्रांती द्यायची असेल तर त्याला संघात निवडल्यानंतर बाहेर बसवणे चुकीचे आहे. विश्रांतीचा अर्थ बुमराहप्रमाणे असावा, ज्याला वर्कलोड मॅनेजमेंटसाठी थेट मालिकेसाठीच विश्रांती दिली जाते. सातत्य नसण्यामुळे खेळाडूच्या लयीवर परिणाम होतो आणि पर्यायाने कामगिरी खालावते."
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत अर्शदीप भारताचा सर्वात किफायतशीर गोलंदाज होता. त्याने ३ सामन्यांत ५.५० च्या इकॉनॉमीने ५ बळी घेतले होते. इतक्या चांगल्या कामगिरीनंतरही त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बेंचवर बसवण्याच्या निर्णयावर अनेक माजी खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
नाणेफेकीदरम्यान कर्णधार शुभमन गिलने संघ निवडीवर स्पष्टीकरण दिले. गिल म्हणाला, "आम्ही सध्या वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार करून खेळत आहे. कोणत्या जोड्या अधिक प्रभावी ठरतात हे आम्हाला पाहायचे आहे." त्याने पुढे असेही नमूद केले की, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळल्याचा अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे.
या सामन्यातून श्रेयस अय्यरने दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे, तर मोहम्मद सिराजनेही नोव्हेंबरनंतर खेळताना दिसत आहे.