पॅरिस; वृत्तसंस्था : दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत गुरुवारी मोठा उलटफेर घडवला. तिने जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या चीनच्या वांग झी यी हिला पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्याचबरोबर, भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या मिश्र दुहेरी जोडीनेही पाचव्या मानांकित जोडीला नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या सिंधूने केवळ 48 मिनिटांत वांग झी यी वर 21-19, 21-15 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. या विजयासह तिने वांगविरुद्धच्या समोरासमोरच्या लढतींमध्ये 3-2 अशी आघाडी घेतली आहे. 30 वर्षीय सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना इंडोनेशियाच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या पुत्री कुसुमा वर्दानी हिच्याशी होणार आहे.
याशिवाय, भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या जोडीनेही मोठा उलटफेर घडवताना 63 मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या लढतीत हाँगकाँगच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या तांग चुन मान आणि त्से यिंग सुएट या जोडीला 19-21, 21-12, 21-15 असे पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने विद्यमान आशियाई विजेत्यांविरुद्ध झुंजार पुनरागमन करत हा विजय साकारला. यापूर्वी त्यांनी आयर्लंडच्या जोशुआ मॅगी आणि मोया रायन या जोडीवर 21-11, 21-16 असा सहज विजय मिळवला होता.