स्पोर्ट्स

पंजाबचा विजयी ‘चौकार’! सलग चौथ्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सच्या गोटात चिंता

दिनेश चोरगे

गुवाहाटी; वृत्तसंस्था : कर्णधार सॅम कुरेनच्या (नाबाद 63 धावा व 2 बळी) अष्टपैलू योगदानाच्या बळावर पंजाब किंग्सने येथील आयपीएल साखळी सामन्यात राजस्थान रॉयल्सला 5 गडी राखून पराभूत करत धक्कादायक निकाल नोंदवला. एकीकडे पंजाबसाठी हा सलग चौथा विजय ठरला, तर राजस्थानसाठी सलग चौथा पराभव ठरला. आयपीएल गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी असलेल्या राजस्थानसाठी खर्‍या अर्थाने हा वेकअप कॉल ठरला आहे. राजस्थानला 9 बाद 144 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखल्यानंतर पंजाबने 18.5 षटकांत 5 बाद 145 धावांसह एकतर्फी विजय संपादन केला. सॅम कुरेनची अष्टपैलू खेळी या लढतीचे ठळक वैशिष्ट्य ठरले.

विजयासाठी 145 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना कर्णधार सॅम कुरेनने आपल्या झंझावाती खेळीच्या बळावर या सामन्याला एकतर्फी स्वरूप दिले. त्याने अवघ्या 41 चेंडूंत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 63 धावांची खेळी साकारली. वास्तविक, पंजाबची डावाची सुरुवात 8 षटकांत 4 बाद 45 अशी खराब झाली होती; पण कुरेनने आणखी पडझड न होऊ देता विजयाचे सोपस्कार पूर्ण करून दिले. पंजाबचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असल्याने त्यांच्यासाठी ही लढत फारशी महत्त्वाची नव्हती. पंजाबसाठी हा या हंगामातील 13 सामन्यांतील पाचवा विजय ठरला.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. रियान परागने चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरत 34 चेंडूंत 48 धावा जमवल्या आणि हीच राजस्थानतर्फे सर्वोच्च खेळी ठरली. त्याच्या या डावात 6 चौकारांचा समावेश राहिला. याशिवाय, रविचंद्रन अश्विनने 19 चेंडूंत 28, तर टॉम कोहलर-कॅडमोर व संजू सॅमसन यांनी प्रत्येकी 18 धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत हर्षल पटेल, राहुल चहर व सॅम कुरेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अर्शदीप सिंग व नॅथन इलिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी असल्याने तसेच पंजाब सुपर किंग्स तळाच्या क्रमवारीत असल्याने ही लढत औपचारिकच होती.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 9 बाद 144. (रियान पराग 48, आर. अश्विन 28, सॅम करेन 2/24, राहुल चहर 2/24, हर्षल पटेल 2/28.)
पंजाब किंग्ज : 18.5 षटकांत 5 बाद 145. (सॅम कुरेन नाबाद 63, जितेश शर्मा 22, आवेश खान 2/28, यजुवेंद्र चहल 2/31.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT