मुल्लनपूर : पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन किंग्ज संघांत रंगलेला मुकाबला पंजाबने जिंकून आपणच खरे ‘किंग’ असल्याचे दाखवून दिले. युवा तारा प्रियांश आर्य (103) शतकाच्या जोरावर पंजाबने 6 बाद 219 धावा केल्या. याचा पाठलाग करताना चेन्नई एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले आणि त्यांना विजयी स्टेशन गाठता आले नाही. त्यांनी 5 बाद 201 धावा केल्या.
पंजाबच्या 219 धावांचा पाठलाग करताना रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे या किवी फलंदाजांनी चेन्नईसाठी 61 धावांची सलामी दिली. मॅक्सवेलने रचिनला (36) बाद करून ही जोडी फोडली. पाठोपाठ कर्णधार ऋतुराज गायकवाड (1) वर बाद झाला. फर्ग्युसनने त्याची विकेट घेतली. यानंतर कॉनवे आणि दुबेने पंजाबच्या गोलंदाजांचा नेटाने मुकाबला करीत धावा गोळा करण्यास सुरुवात केली. कॉनवेने 37 चेंडूंत अर्धशतक केले; पण त्यानंतर फर्ग्युसनने दुबेचा 42 धावांवर त्रिफळा उडवला. चेन्नईला 25 चेंडूंत 59 धावांची आवश्यकता असताना पाचव्या क्रमांकावर धोनी खेळायला आला; पण त्यानंतर डेव्हॉन कॉनवे दमल्यामुळे रिटायर झाला. दरम्यान, धोनीने फर्ग्युसनला दोन षटकार मारले.
शेवटच्या 12 चेंडूंत चेन्नईला 43 धावांची गरज होती. धोनी आणि जडेजा मैदानावर होते. अर्शदीपच्या या षटकात धोनीने एक चौकार आणि षटकार ठोकून 15 धावा घेतल्या. शेवटच्या 6 चेंडूंवर 28 धावांची गरज असताना यश ठाकूरने धोनीला बाद केले. त्याने 12 चेंडूंत 27 धावा केल्या. उरलेल्या 5 चेंडूंत 9 धावा निघाल्या. त्यामुळे चेन्नईचा 18 धावांनी पराभव झाला. प्रभसिमरन सिंगला दुसर्याच षटकात मुकेश चौधरीने भोपळ्यावर माघारी पाठवले. खलील अहमदने त्यानंतर दोन धक्के देताना श्रेयस अय्यरचा (9) त्रिफळा उडवला अन् मार्कस स्टॉईनिसला (4) झेलबाद केले. आर. अश्विनने दोन महत्त्वाच्या विकेटस् घेताना चेन्नईला सामन्यात ठेवले होते. अश्विनने ग्लेन मॅक्सवेलचा (1) अप्रतिम रिटर्न झेल टिपला, तर नेहाल वढेरालाही 9 धावांवर बाद केले.
5 बाद 85 अशी अवस्था असताना प्रियांश व शशांक सिंग ही जोडी मैदानावर उभी राहिली. प्रियांशने 39 चेंडूंत शतक पूर्ण केले आणि या प्रवासात त्याचे दोन झेल सोडण्याचा फटका चेन्नईला बसला. ‘आयपीएल’मध्ये हे भारतीय फलंदाजाकडून झालेले दुसरे वेगवान शतक ठरले. चेन्नईचे क्षेत्ररक्षण मंगळवारी गचाळच राहिले. नूर अहमदने चेन्नईला ही मोठी विकेट मिळवून दिली. प्रियांश 42 चेंडूंत 7 चौकार व 9 षटकारांसह 103 धावांवर बाद झाला. शशांक सिंगनेही मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलून पंजाबला दोनशेपार पोहोचवले. त्याच्या सोबतीला मार्को जॅन्सेन उभा राहिला आणि त्याने 19 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 34 धावा केल्या. पंजाबने 20 षटकांत 6 बाद 219 धावा केल्या. शशांक 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह 52 धावांवर नाबाद राहिला.
पंजाबच्या ताफ्यातील युवा डावखुरा फलंदाज प्रियांश आर्य याने चेन्नई विरुद्ध शतकी खेळीसह नवा इतिहास रचला आहे. युवा सलामीवीराने तोर्यात फटकेबाजी करत 39 चेंडूंत शतक पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादच्या इशान किशननंतर यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. ‘आयपीएल’च्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय खेळाडूची ही दुसरी जलद शतकी खेळी ठरली. भारताकडून ‘आयपीएल’मध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा युसूफ पठाणच्या नावे आहे. त्याने 37 चेंडूंत ‘आयपीएल’मध्ये शतक झळकावले होते. प्रियांश आर्य हा पंजाब किंग्जच्या फ्रँचायझी संघाडून सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाजही ठरला आहे. याआधी 2013 मध्ये डेव्हिड मिलरने या फ्रँचायझी संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध 38 चेंडूंत शतक झळकावले होते. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत सर्वात जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम आता प्रियांशच्या नावे झाला आहे. ‘आयपीएल’मध्ये सर्वात जलद शतक झळकवण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने 2013 च्या हंगामात पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुद्ध 30 चेंडूंत शतक पूर्ण केले होते. पदार्पणात प्रियांश सर्वात जलदगतीने शतक साजरे करणार्या एलिट क्लबमध्ये सामील झाला.
30 - ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळूर, 2013
37 - युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2010
38 - डेव्हिड मिलर (पंजाब) विरुद्ध आरसीबी, मोहाली, 2013
39 - ट्रॅव्हिस हेड (हैदराबाद) विरुद्ध आरसीबी, बंगळूर, 2024
39 - प्रियांश आर्य (पंजाब) विरुद्ध सीएसके, मुल्लापूर, 2025
पंजाब किंग्ज : 20 षटकांत 6 बाद 219 धावा. (प्रियांश आर्य 103, शशांक सिंग 52, मार्को जॅन्सेन 34. खलील अहमद 2/45)
चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 5 बाद 201 धावा. (डेव्हान कॉनवे 69, शिवम दुबे 42. लॉकी फर्ग्युसन 2/40)