मुल्लनपूर : घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना फसलेल्या पंजाब किंग्ज संघाने अल्प धावसंख्येचा बचाव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पंजाब किंग्जच्या संघाने 111 धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर 112 धावांचे टार्गेट सेट केले होते. ही धावसंख्या कोलकाताचा संघ अगदी सहज पार करेल, असे वाटत होते; पण युजवेंद्र चहलने घेतलेल्या 4 विकेटस् अन् त्याला जॅन्सेनसह अन्य गोलंदाजांनी दिलेली उत्तम साथ याच्या जोरावर पंजाबने कोलकाताला 95 धावांवर रोखत हा सामना जिंकून दाखवला. ‘आयपीएल’च्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे असलेल्या पंजाब किंग्जच्या संघाने आता सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करून दाखवत नवा इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्जने 2009 मध्ये 116 धावांचा यशस्वी बचाव केला होता आणि तो विक्रम मोडला गेला.
कोलकाताची सुरुवात काही खास झाली नाही. मार्को जॅन्सेनने पहिल्याच षटकात सुनील नारायणचा (5) त्रिफळा उडवला आणि संधी मिळालेल्या झेव्हियर बार्टलेटने दुसरा धक्का दिला. क्विंटन डी कॉक 2 धावांवर झेलबाद झाला. अजिंक्य रहाणे व अंगकृश रघुवंशी यांनी केकेआरचा डाव सावरला. या दोघांची 55 धावांच्या भागीदारीला युजवेंद्र चहलने ब्रेक लावला. अजिंक्य स्वीप मारण्याच्या प्रयत्नात 17 धावांवर पायचीत केले.खरे तर अजिंक्य यावेळी बाद नव्हता. रिप्लेमध्ये चेंडू स्टम्पला लागत नसल्याचे दिसले. परंतु, तो डीआरएस न घेताच मैदानातून बाहेर गेला आणि इथेच केकेआरचा घात झाला. अजिंक्यच्या विकेटनंतर चहलने आणखी धक्के दिले. रघुवंशी 28 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 37 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने वेंकटेश अय्यरची (7) विकेट मिळवून दिली. त्यानंतर चहलने रिंकू सिंग (2) व रमणदीप सिंग (0) यांच्या विकेटस् घेताना सामन्याला कलाटणीच दिली. पहिल्या 6 षटकांत कोलकाताने 55 धावांत 2 विकेटस् गमावल्या होत्या आणि त्यानंतरच्या पुढील काही षटकांत त्यांनी 24 धावांवर 5 विकेटस् गमावल्या.
आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांच्याकडूनच आशा होत्या; पण श्रेयसने गोलंदाजीसाठी मार्को जॅन्सेनला परत बोलावले आणि त्याने हर्षितचा (3) त्रिफळा उडवून 79 धावांवर आठवा धक्का दिला. चहलच्या पहिल्या तीन षटकांत 3 विकेटस् आल्या होत्या आणि चौथ्या षटकात आंद्रे रसेलने त्याला झोडला. 42 चेंडूंत 33 धावा हव्या असताना चहलच्या त्या षटकात रसेलने 16 धावा चोपल्या. आता कोलकाताला 36 चेंडूंत 17 धावा हव्या होत्या. वैभव अरोराने 18 व्या षटकात अर्शदीप सिंगच्या भेदक मार्याचा सामना करून पाच चेंडूंवर चांगला बचाव केला; पण अर्शदीपने शेवटचा चेंडू ओव्हर द विकेट येताना बाऊन्सर वैभवच्या शरीरावर फेकला अन् ग्लोव्हजला चेंडू घासून यष्टिरक्षकाकडे विसावला. मार्को जॅन्सनने 16 व्या षटकात रसेलला (17) बाद करून पंजाबला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. कोलकाताचा संपूर्ण संघ 15.1 षटकांत 95 धावांवर तंबूत परतला अन् पंजाबने 16 धावांनी विजय मिळवला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पंजाब किंग्जच्या श्रेयस अय्यरने घेतला. पंजाबचा संघ 15.3 षटकांत 111 धावांवर तंबूत परतला. प्रियांश आर्या (22) व प्रभसिमरन सिंग (30) यांनी सुरुवात चांगली केली; पण हर्षित राणाने पॉवर प्लेमध्ये धक्के दिले. अय्यर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्थी (2-21), व सुनील नारायण (2-14) यांनी पंजाबची मधली फळी गुंडाळली. ग्लेन मॅक्सवेल (7) आजही अपयशी ठरला. शशांक सिंग (18) मैदानावर असल्याने आस होती. परंतु, वैभव अरोराने त्याला पायचीत पकडले आणि पंजाबला नववा धक्का दिला. पंजाबचा संघ 15.3 षटकांत 111 धावांवर ऑल आऊट झाला. हर्षित राणाने सर्वाधिक 3, तर सुनील नारायण व वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.
पंजाब किंग्ज : 15.3 षटकांत सर्वबाद 111 धावा. (प्रभसिमरन सिंग 30, प्रियांश आर्या 22. हर्षित राणा 3/25.
कोलकाता नाईट रायडर्स : 15.1 षटकांत सर्वबाद 95 धावा. (अंगक्रीश रघुवंशी 37, आंद्रे रसेल 17. यजुवेंद्र चहल 4/28)