CSK vs PBKS | पंजाबचा स्वप्नवत विजय! बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का R Senthilkumar
स्पोर्ट्स

CSK vs PBKS | पंजाबचा स्वप्नवत विजय! बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा धक्का

पुढारी वृत्तसेवा

चेन्नई; वृत्तसंस्था : पहिल्या चारही आघाडीवीरांनी किमान 35 धावांचे योगदान दिल्यानंतर पंजाब किंग्जने येथील ‘आयपीएल’ साखळी सामन्यात बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध स्वप्नवत विजय मिळवला. विजयासाठी 210 धावांचे आव्हान असताना प्रियांश आर्य (39), प्रभसिमरन सिंग (43), कूपर कॉनोली (36) व कर्णधार श्रेयस अय्यर (29 चेंडूंत 50) यांनी आक्रमक फलंदाजी करत विजय द़ृष्टिक्षेपात आणला. शशांक सिंग व मार्कस स्टोईनिस यांनी 18.4 षटकांत 5 गड्यांच्या बदल्यात विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. चेन्नईतर्फे मॅट हेन्री व अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

आयुष म्हात्रेची फटकेबाजी निष्फळ

युवा फलंदाज आयुष म्हात्रेने अवघ्या 43 चेंडूंत 73 धावांची आतषबाजी केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 बाद 209धावांपर्यंत मजल मारली. म्हात्रेला शिवम दुबे (27 चेंडूंत 45) व सरफराज खान (12 चेंडूंत 32) यांनी उत्तम साथ दिली. मात्र, यानंतरही चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.

प्रारंभी, पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. सलामीवीर संजू सॅमसन अवघ्या 7 धावांवर बाद झाल्याने चेन्नईला पहिला धक्का बसला. सॅमसनने बार्टलेटच्या चेंडूवर अ‍ॅक्रॉस फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीमागे प्रभसिमरन सिंगकडे सोपा झेल दिला. कर्णधार ऋतुराज गायकवाड व आयुष म्हात्रे यांनी मात्र आणखी पडझड होऊ न देता धावफलक सातत्याने हलता ठेवण्यावर भर दिला.

उभयतात आयुष म्हात्रे अधिक आक्रमक पवित्र्यात होता. त्याने स्टोईनिसला लागोपाठ खेचलेले दोन षटकार विशेष लक्षवेधी ठरले. म्हात्रेने येथे 43 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांसह 73 धावांची लक्षवेधी खेळी साकारली. त्याने पंजाबच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजाचा उत्तम समाचार घेतला. कर्णधार ऋतुराज 22 चेंडूंत 28 धावांवर चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता.

सॅमसन बाद झाला, त्यावेळी संघाच्या खात्यावर अवघ्या 14 धावा होत्या. मात्र, त्यानंतर आयुष म्हात्रे व ऋतुराज गायकवाड यांनी दुसर्‍या गड्यासाठी 96 धावांची भागीदारी साकारत संघाला सुस्थितीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अंतिमत: चहलने ऋतुराजला वधेराकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. ऋतुराज बाद झाल्यानंतर आयुष म्हात्रेही लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. विजयकुमार विशाखने त्याला चहलकरवी झेलबाद केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT