रुदरफोर्ड : फॅबियन रुईझच्या दुहेरी गोलच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेनने रियल माद्रिदचा धुव्वा उडवत फिफा क्लब विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत चेल्सीविरुद्ध आपले स्थान निश्चित केले. फॅबियन रुईझने दोन गोल केले, तर औसमाने डेम्बेलेने एक गोल आणि एका गोलसाठी सहाय्य केले. या कामगिरीच्या बळावर पॅरिस सेंट-जर्मेनने उपांत्य सामन्यात रियल माद्रिद आणि किलियन एम्बाप्पे यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवत 4-0 असा सहज विजय मिळवला.
‘पीएसजी’ने पहिल्या 24 मिनिटांतच 3-0 अशी आघाडी घेतली, ज्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माद्रिदच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले. दुसर्या सत्राच्या सुरुवातीला डेम्बेलेच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या गोन्सालो रामोसने 87 व्या मिनिटाला आणखी एक गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
जियानलुईगी डोनारुम्माने सामन्याच्या सुरुवातीला एम्बाप्पेचा एक फटका अडवला आणि एकूण दोन बचाव केले. मात्र, याव्यतिरिक्त ‘पीएसजी’च्या बचावफळीला फारसे आव्हान मिळाले नाही आणि त्यांनी स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये पाचव्यांदा आपली क्लीन शीट (एकही गोल न स्वीकारता) कायम राखली. गेल्या वर्षी माद्रिदमध्ये सामील होण्यापूर्वी सात वर्षांत ‘पीएसजी’साठी 256 गोल करणार्या एम्बाप्पेचा हा ‘पीएसजी’विरुद्धचा पहिलाच सामना होता.
चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात ‘पीएसजी’कडून 5-0 ने पराभूत झालेल्या इंटर मिलानपेक्षा रियल माद्रिदची कामगिरी चांगली नव्हती. मेटलाईफ स्टेडियममध्ये रणरणत्या उन्हात 77,542 प्रेक्षक उपस्थित होते. सामन्याच्या सुरुवातीला तापमान 33 अंश सेल्सिअस (91 अंश फॅरेनहाईट) होते आणि आर्द्रतेमुळे ते 38 अंश सेल्सिअस (101 अंश फॅरेनहाईट) जाणवत होते.
मात्र, ‘पीएसजी’च्या आक्रमक फळीने अजिबात वेळ न दवडता पहिल्या पाच मिनिटांतच कोर्टुआला दोन महत्त्वपूर्ण बचाव करण्यास भाग पाडले. परंतु, सहाव्या मिनिटाला डेम्बेलेने बॉक्सच्या मध्यभागी रॉल एसेन्सियोकडून चेंडू हिसकावून घेतला, झेपावलेल्या कोर्टुआच्या हाताला चकवून तो रुईझकडे पास केला आणि रुईझने वन-टाईमर फटक्यावर चेंडू थेट जाळ्यात धाडला होता.
आपले पहिले युरोपियन विजेतेपद जिंकल्यानंतर, ‘पीएसजी’ आता रविवारी विजेतेपदासाठी खेळेल. पॅरिस सेंट-जर्मेनचा अंतिम सामना रविवारी चेल्सीविरुद्ध होईल. चेल्सीने 2021 मध्ये हे विजेतेपद जिंकले होते, तर ‘पीएसजी’ फ्रान्सकडून ही स्पर्धा जिंकणारा पहिला संघ बनण्याचा प्रयत्न करेल.