रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारा दुसरा फलंदाज बनून पृथ्वी शॉने इतिहास रचला.
त्याने चंदीगडविरुद्ध २२२ धावा केल्या, १४१ चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले आणि शानदार कामगिरी केली.
पहिल्या डावात पृथ्वी शॉ फक्त ८ धावांवर बाद झाला होता पण दुसऱ्या डावात त्याने जबरदस्त पुनरागमन केले.
पृथ्वी शॉने महाराष्ट्राकडून आपल्या दुसऱ्याच रणजी करंडक सामन्यात विक्रमी प्रदर्शन केले आहे. चंदीगढविरुद्धच्या खेळताना या या २५ वर्षीय फलंदाजाने एक नवा विक्रम नोंदवला. तसेच त्याने भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि रवी शास्त्री यांच्यासारख्या दिग्गजांची बरोबरी केली.
भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या ध्येयाने खेळणाऱ्या पृथ्वी शॉने आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. २०२५-२६ रणजी करंडक हंगामातील दुसऱ्या सामन्यात, चंदीगढ येथील सेक्टर १६ क्रिकेट स्टेडियमवर त्याने महाराष्ट्रासाठी आपले पहिले शतक झळकावले. पहिल्या डावात केवळ ८ धावा करणाऱ्या शॉने दुसऱ्या डावात अविस्मरणीय कामगिरी केली. त्याने केवळ १५६ चेंडूंमध्ये २२२ धावांची दमदार खेळी साकारली. ज्यात २९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेटही १४२.३१ इतका अविश्वसनीय राहिला. मुंबईचा हा माजी फलंदाज अवघ्या ७३ चेंडूंमध्ये शतकापर्यंत पोहोचला, तर दुहेरी शतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ १४१ चेंडू घेतले.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम हैदराबादच्या तन्मय अग्रवालच्या नावावर आहे. त्याने २०२४ मध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध १११ चेंडूंमध्ये हे द्विशतक पूर्ण केले होते. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारताचे माजी प्रशिक्षक आणि खेळाडू रवी शास्त्री आहेत. १९८५ मध्ये शास्त्री यांनी बडोद्याविरुद्ध १२३ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले होते.
प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये दोनदा २०० पेक्षा कमी चेंडूंमध्ये दुहेरी शतक झळकावणारा शॉ वीरेंद्र सेहवागनंतरचा दुसरा भारतीय ठरला आहे. विशेष म्हणजे, सेहवागने आपल्या कारकिर्दीत हा पराक्रम तीन वेळा केला आहे, जो ग्रीम हिक सोबत जगात सर्वाधिक आहे. २०० पेक्षा कमी चेंडूंमध्ये एकाधिक दुहेरी शतक झळकावणाऱ्या जगातील केवळ आठ खेळाडूंच्या दुर्मिळ यादीत सेहवाग आणि शॉ यांचा समावेश आहे.
चंदीगडचा कर्णधार मनन वोहराने टॉस जिंकून महाराष्ट्राविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात महाराष्ट्राने ३१३ धावा केल्या. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने ११६ धावांचे योगदान दिले, तर चंदीगडसाठी जगजीत सिंग आणि अभिषेक सैनी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
यानंतर चंदीगडचा संघ पहिल्या डावात २०९ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात महाराष्ट्राने ३ गडी गमावून ३५९ धावांवर आपला डाव घोषित केला आणि चंदीगडसमोर ४६४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. शॉ व्यतिरिक्त, महाराष्ट्रासाठी दुसऱ्या डावात सिद्धेश वीरने ६२ आणि ऋतुराज गायकवाडने नाबाद ३६ धावा केल्या.