स्पोर्ट्स

Prithvi Shaw Transfers : पृथ्वी शॉचा मोठा निर्णय, ‘मुंबई’ला सोडचिठ्ठी देत ‘महाराष्ट्र’ संघात घेतली एन्ट्री

एकेकाळी भारतीय क्रिकेटचे भविष्य मानल्या जाणाऱ्या 25 वर्षीय पृथ्वी शॉने आपल्या कारकिर्दीला पुन्हा एकदा गती देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

रणजित गायकवाड

prithvi shaw shift to maharashtra cricket team in domestic cricket

भारतीय संघातून बाहेर असलेल्या स्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) अलविदा करत आगामी देशांतर्गत हंगामासाठी नव्या संघाकडून खेळण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेतले होते.

एकेकाळी भारतीय क्रिकेटचे भविष्य मानल्या जाणाऱ्या 25 वर्षीय पृथ्वी शॉने आपल्या कारकिर्दीला पुन्हा एकदा गती देण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. प्रदीर्घ काळापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबतचे आपले जुने नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याने ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता, जो त्याला मंजूरही झाला. अखेर, पृथ्वी शॉच्या नव्या संघाच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे.

आव्हानात्मक काळानंतर नव्या सुरुवातीचा निर्धार

पृथ्वी शॉने 2017 मध्ये मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या आक्रमक फलंदाजीने अल्पावधीतच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी पदार्पणातच शतक झळकावून त्याने आपण भारतीय क्रिकेटचे भावी सुपरस्टार असल्याचे सिद्ध केले होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली राहिली. तंदुरुस्ती आणि शिस्तीशी संबंधित काही समस्यांमुळे त्याच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला.

2024-25 च्या रणजी करंडक हंगामात त्याला मुंबईच्या संघातून वगळण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नाही. या सर्व आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, पृथ्वीने नवी सुरुवात करण्यासाठी मुंबईला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून अधिकृत घोषणा

पृथ्वी शॉ आता आगामी हंगामात महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून खेळताना दिसणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) एक प्रसिद्धीपत्रक जारी करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने अधिकृतपणे मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबतचे नाते संपुष्टात आणले असून, तो आगामी देशांतर्गत हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) प्रतिनिधित्व करेल. हा धोरणात्मक बदल भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिला जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्र संघाला अधिक बळकटी मिळेल. शॉने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि सामना जिंकून देण्याच्या क्षमतेने इंडियन प्रीमियर लीग व देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभावित केले आहे. विशेष म्हणजे, त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने 2018 मध्ये आयसीसी 19-वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.’

या बदलावर प्रतिक्रिया देताना पृथ्वी शॉ म्हणाला, ‘माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, महाराष्ट्र संघात सामील झाल्याने मला एक क्रिकेटपटू म्हणून पुढे जाण्यास मदत होईल, असा माझा विश्वास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अत्यंत आभारी आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलिकडच्या काळात राज्यभरात क्रिकेटच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. अशा प्रगतीशील व्यवस्थेचा भाग होणे माझ्यासाठी निश्चितच सकारात्मक असेल. महाराष्ट्र संघात ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुरबनी आणि मुकेश चौधरी यांसारख्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT