Prithvi Shaw file photo
स्पोर्ट्स

Prithvi Shaw : पृथ्वी शॉचा मुंबई क्रिकेटला रामराम, आता दुसऱ्या संघातून खेळणार!

भारतीय संघातून बाहेर असलेला फलंदाज पृथ्वी शॉ याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

मोहन कारंडे

Prithvi Shaw

मुंबई : भारतीय संघातून बाहेर असलेला क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने त्याला दुसऱ्या संघाकडून खेळण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे. त्यामुळे आगामी देशांतर्गत हंगामात दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एक क्रिकेटपटू म्हणून प्रगती आणि विकासासाठी नवीन देशांतर्गत संघाशी करार करता यावा, यासाठी पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. एमसीएचे सचिव अभय हडाप म्हणाले की, "राज्य संघटना पृथ्वीच्या अनेक वर्षांच्या योगदानाचे कौतुक करते. पृथ्वी शॉ एक असाधारण प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्याच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देतो."

बेशिस्त वर्तणुकीमुळेच अधिक चर्चेत

पृथ्वी गेल्या काही काळापासून कसोटी संघातून बाहेर आहे, परंतु तो मर्यादित षटकांचे सामने खेळला आहे. फलंदाज म्हणून अलौकिक प्रतिभा असूनही पृथ्वीला कामगिरीत कधीही सातत्य राखता आले नाही. तसेच त्याच्या तंदुरुस्तीवरही वारंवार प्रश्न उपस्थित झाले. याच कारणास्तव त्याला मुंबई रणजी संघातून वगळण्यातही आले होते. मैदानावरील कामगिरीपेक्षा तो मैदानाबाहेरील बेशिस्त वर्तणुकीमुळेच अधिक चर्चेत राहिला. त्याने मुंबई संघ सोडण्याची इच्छा व्यक्त करताना 'एमसीए'ला पत्र लिहिले आणि 'एमसीए'च्या कार्यकारी परिषदेने त्याची विनंती मान्य केली आहे. मुंबई संघात घालवलेल्या वेळेबद्दल तो कृतज्ञ आहे, पण आता त्याला पुढे जायचे आहे, असे पृथ्वी म्हणाला.

गेल्या वर्षी मुंबई संघातून वगळले

पृथ्वीने २०१७ मध्ये मुंबईकडून पदार्पण केले होते. खराब फिटनेस आणि शिस्तीच्या अभावामुळे पृथ्वीला गेल्या वर्षी मुंबईच्या रणजी संघातून वगळण्यात आले होते. पृथ्वी मुंबईकडून शेवटचा सामना मध्य प्रदेशविरुद्ध मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या अंतिम फेरीत खेळला होता. पृथ्वीच्या फिटनेस आणि शिस्तीवर केवळ प्रशासकांनीच टीका केली नाही, तर मुंबईला मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरही नाराज होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT