पुणे : भारताचा माजी युवा कर्णधार आणि सध्या महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात आपला संयम गमावल्याची धक्कादायक घटना घडली. फलंदाजीनंतर रागाच्या भरात त्याने मुंबईच्या मुशीर खान या खेळाडूकडे बॅट घेऊन धाव घेतल्याने मैदानात खळबळ उडाली. खेळाडू आणि पंचांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेपूर्वी मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात पुण्यात मंगळवार (७ ऑक्टोबर) पासून सुरू झालेल्या सराव सामन्यादरम्यान हा धक्कादायक प्रसंग क्रीडारसिकांना पाहायला मिळाला.
आठ वर्षे मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर नुकताच महाराष्ट्राच्या संघात दाखल झालेल्या पृथ्वी शॉने या सामन्यात २१९ चेंडूंत १८१ धावांची शानदार खेळी साकारली. रणजी करंडक स्पर्धेच्या तयारीसाठीच्या या सामन्यात त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.
२५ वर्षीय शॉने १४० चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. १८१ धावांवर फलंदाजी करत असताना तो मुशीर खानच्या गोलंदाजीवर फाइन लेगवर झेलबाद झाला. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना शॉ आणि मुशीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादाने इतके गंभीर रूप घेतले की, शॉने संतप्त होऊन बॅट मुशीर खानच्या दिशेने फेकली. मात्र, पंचांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. मुशीर खान हा भारताचा कसोटीपटू सरफराज खानचा धाकटा भाऊ आहे.
शॉने २०१८ मध्ये भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकून दिला होता आणि त्याच वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला भारताचा एक मोठा फलंदाज म्हणून पाहिले जात होते. मात्र, त्यानंतर त्याचा फॉर्म खालावला आणि अनेक विवादामुळे तो चर्चेत राहिला. गेल्या काही वर्षांपासून शॉ फॉर्म, तंदुरुस्ती आणि शिस्तीच्या समस्यांशी झगडत आहे. त्याने २०२० मध्ये भारताकडून शेवटचा सामना खेळला. तर आयपीएल २०२५ च्या लिलावातही त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही.
दरम्यान, मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात पृथ्वी शॉने आपल्या फलंदाजीचे कौशल्य सिद्ध दाखवले. सलामीवीर अरशिन कुलकर्णीसोबत त्याने पहिल्या विकेटसाठी केवळ ४९.४ षटकांत ३०५ धावांची दमदार भागीदारी केली. कुलकर्णीने १४० चेंडूंत १८६ धावांची झंझावाती खेळी केली, तर शॉच्या खेळीत आक्रमकता आणि नियंत्रणाचा उत्तम समन्वय दिसून आला. महाराष्ट्राने आपला पहिला डाव ३ बाद ४६५ धावांवर घोषित केला.
मुंबईच्या गोलंदाजीत कर्णधार शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, फिरकी गोलंदाज तनुष कोटियन आणि शम्स मुलानी यांचा समावेश होता. अष्टपैलू शिवम दुबेही मुंबई संघाचा भाग होता, जो नुकताच आशिया चषकातून परतला आहे.