भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून एकेकाळी गौरवण्यात आलेला युवा फलंदाज पृथ्वी शॉ, आज राष्ट्रीय संघाच्या निवडीच्या स्पर्धेतही नाही. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईच्या अंतिम संघातून वगळल्यानंतर, काही महिन्यांतच विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातही त्याला स्थान मिळाले नाही. अखेर, आपल्या कारकिर्दीतील या खडतर टप्प्याबद्दल मौन सोडताना, 25 वर्षीय शॉने आपण लक्ष्यापासून भरकटलो असल्याचे मान्य केले आहे.
शॉने 2018 मध्ये आपल्या कसोटी पदार्पणातच 134 धावांची खेळी केली होती. यानंतर, तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पृथ्वी शॉ हा सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग यांचा मिलाफ आहे, असे विधान करत कौतुकाचा वर्षाव केला होता.
गतवर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या मेगा लिलावात शॉसाठी कोणीही बोली लावली नाही. तो अनसोल्ड राहिला. हंगाम सुरू झानंतर अनेक संघांमधील खेळाडू दुखापतग्रस्त असूनही, कोणत्याही फ्रँचायझीने शॉला बदली खेळाडू म्हणूनही संघात स्थान दिले नाही.
‘यामागे अनेक कारणे आहेत. लोकांना दिसणारे चित्र वेगळे आहे, कारण काय घडले आहे, हे मला माहीत आहे. मी ते समजू शकतो. मी आयुष्यात अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. मी क्रिकेटला कमी वेळ देऊ लागलो. पूर्वी मी खूप सराव करायचो. नेटमध्ये 3-4 तास फलंदाजी करायचो. फलंदाजीचा मला कधीच कंटाळा येत नसे. मी अर्धा दिवस मैदानावरच असायचो. पण माझे लक्ष विचलित झाले, हे मी आता मान्य करतो,’ असे स्पष्टोक्ती शॉने दिली.
‘त्यानंतर, मी अनावश्यक गोष्टींना आवश्यक मानू लागलो. मी काही चुकीचे मित्र बनवले. कारण त्यावेळी मी यशाच्या शिखरावर होतो. मग ते मला इकडे-तिकडे घेऊन जाऊ लागले. मी त्यानंतर मी मार्गावरून भरकटलो. मी मैदानावर 8 तास सराव करायचो, आता तो 4 तासांवर आला आहे,’ असे त्याने पुढे सांगितले.
नुकतेच दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (MCA) ना-हरकत प्रमाणपत्र (No-Objection Certificate) मागणाऱ्या पृथ्वी शॉने, आपल्याला कौटुंबिक समस्या असल्याचेही उघड केले आणि त्यामुळेही त्याचे लक्ष विचलित झाले होते, असे त्याने म्हणणे आहे.
आजोबांच्या निधनानंतर आपण कशाप्रकारे एका कठीण काळातून गेलो, याविषयी त्याने खुलासा केला. ‘अशा अनेक गोष्टी आहेत. केवळ तेवढेच नाही. मला कौटुंबिक समस्या होती. माझ्या आजोबांचे निधन झाले होते. ते मला खूप प्रिय होते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगू शकत नाही.’
‘मी माझ्या चुका मान्य करतो. पण माझा काळ कितीही वाईट असला तरी, माझ्या वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांनी चांगले आणि वाईट दोन्ही पाहिले आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने आपल्यासाठी बोली न लावल्याने मला धक्का बसला नाही, कारण मी त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो,’ असेही पृथ्वी शॉ म्हणाला.
पृथ्वी शॉने भारताकडून पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. मुंबई रणजी संघ सोडण्यासाठी त्याला ना-हरकत प्रमाणपत्र (No-Objection Certificate) देण्यात आल्याने तो आता दुसऱ्या राज्याच्या संघाचे रणजी ट्रॉफी स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहे.