Punjab Kings Preity Zinta Post: पंजाब किंग्जची यंदाच्या आयपीएल २०२६ मधील सुसाट सुटलेली गाडी शेवटच्या फेजमध्ये येऊन अडखळत आहे. यामुळं प्ले ऑफ गाठण्याचं त्यांचे स्वप्न स्वप्नच राहत का अशी स्थिती निर्माण झाली आहे. कधी काळी अव्वल स्थानावर विराजमान असलेली पंजाब ही आता चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे.
पंजाबला राजस्थान रॉयल्सविरूद्धचे २२३ धावांचे टार्गेट डिफेंड करता आले नव्हते. त्यानंतर गुजरातविरूद्धचे १६३ धावांचे आव्हान पार करताना पंजाबने मधेच गटांगळ्या खाल्या. हैदराबादविरूद्ध देखील पंजाबला ३३ धावा कमी पडल्या. त्यातच दिल्लीनं धमरशालामध्ये पंजाबचे २१० धावांचे आव्हान पार करत त्यांना सलग चौथा पराभवाचा धक्का दिला.
या वाईट कामगिरीनंतर पंजाब संघावर सोशल मीडियावरून तुफान टीका केली जात आहे. संघात शिस्तीवरून काही समस्या आहेत असा देखील दावा केला जात आहे. ही समस्या मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील आहे असा देखील दावा केला जात आहे.
या दाव्यानंतर पंजाब किंग्जची सहमालकीण प्रिती झिंटा संघासाठी धावून आली आहे. तिने चाहत्यांना, माध्यमांना चुकीची माहिती पसरवू नका असं सांगितलं. काहीजण फ्रेंचायजीबाबत कॅल्क्युलेटेड मिसइन्फॉर्मेशन पसरवत आहेत असा देखील आरोप तिने केला.
प्रिती झिंटाने ट्विट केलं की, 'टीका आणि मुद्दाम चुकीची माहिती पसरवणे यात फरक आहे. खेळाबाबतची हेल्दी चर्चेचे स्वागतच आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला संघाला किंवा ब्रँडला हानी पोहचवण्यासाठी मुद्दाम काही फेक नॅरेटिव्ह पसरवणे हलक्यात घेतलं जाणार नाही. मी अधिकृत माध्यमे आणि प्रतिनिधी सर्वांना विनंती करते की कोणतीही अनधिकृत माहिती पुढे देण्याआधी तुमची त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी पार पाडा.'
पंजाब किंग्जने देखील अशाच आशयाचं ट्विट करत लोकांना चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी त्याची शहानिशा करण्याची विनंती केली आहे.
पंजाब किंग्ज आता मुंबई इंडियन्सविरूद्ध सामना खेळणार आहे. या सामन्याचा प्ले ऑफच्या गणितावर थेट परिणाम होणार आहे. मुंबई आधीच बाहेर गेली आहे. जर ती पंजाबविरूद्धचा सामना जिंकली तर पंजाबचा देखील ते गेम करू शकतात. पंजाबला हा सामना जिंकून आपली पराभवाची मालिका खंडीत करणे गरजेचे आहे.