Portugal Vs Spain | ६ मिनिटांसाठी मैदानात आला, पोर्तुगालचे ‘पॅकअप’ करून गेला 
स्पोर्ट्स

Portugal Vs Spain | ६ मिनिटांसाठी मैदानात आला, पोर्तुगालचे ‘पॅकअप’ करून गेला

‘मेरिनो’ ठरला स्‍पेनचा बाहुबली; पूर्ण वेळ मैदानात असूनही रोनाल्‍डोला अपयश

पुढारी वृत्तसेवा

फुटबॉल हा केवळ वेळेचा खेळ नाही, तर योग्य वेळी योग्य संधी साधण्याचा खेळ आहे, याचा प्रत्यय डॅलसच्या मैदानावर आला. ९० मिनिटे मैदानावर घाम गाळूनही पोर्तुगालचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो जे करू शकला नाही, ते स्पेनच्या मिकेल मेरिनोने मैदानात उतरल्यानंतर अवघ्या ६ मिनिटांत करून दाखवले. बदली खेळाडू म्हणून आलेल्या मेरिनोने अतिरिक्त वेळेत (९०+१') अचूक गोल डागत पोर्तुगालला विश्वचषकातून बाहेर फेकलेच; पण सोबतीला रोनाल्डोच्या कारकिर्दीचा शेवटही अश्रूंनी करून दिला. एका बाजूला संपूर्ण सामना खेळूनही अपयशी ठरलेला रोनाल्डो आणि दुसऱ्या बाजूला केवळ ६ मिनिटांत स्पेनचा नायक बनलेला मेरिनो या दोन टोकांमधील फरकच स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन गेला.

फेरान टॉरेसने दिलेल्या उत्कृष्ट पासवर मेरिनोचा अचूक गोल

डॅनी ओल्मोने दिलेल्या पासवर स्पेनच्या मिकेल ओयारझाबालला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र, त्याचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. पोर्तुगालकडून स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने काही आक्रमक चढाया केल्या, तर नुनो मेंडेसचा एक थेट शॉट गोलपोस्टच्या वरच्या बारला लागून परतला. उत्तरार्धात दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा घेतला. सामना अतिरिक्त वेळेकडे झुकत असतानाच, स्पेनच्या दोन बदली खेळाडूंनी कमाल केली. फेरान टॉरेसने दिलेल्या उत्कृष्ट पासवर मिकेल मेरिनोने अचूक आणि शक्तिशाली लो-फिनिश करत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला आणि स्पेनला विजय मिळवून दिला.

मार्टिनेझ यांचा पोर्तुगालच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

या धक्कादायक पराभवानंतर पोर्तुगाल संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉबेर्टो मार्टिनेझ यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना रॉबेर्टो मार्टिनेझ यांनी स्पष्ट केले की, पोर्तुगालला विश्वविजेते बनवण्याच्या मुख्य उद्देशानेच हे पद स्वीकारले होते. हा उद्देश पूर्ण न झाल्यामुळे आता या पदावर राहण्यात कोणताही अर्थ नाही. ‘हा एका चक्राचा अंत आहे. आता पोर्तुगाल संघाला नव्या विचारांची आणि एका नव्या नेतृत्वाची गरज आहे.’

रोनाल्‍डोला अश्रू अनावर!

स्‍पेनकडून पराभवावर शिक्‍कामोर्तब हाेताच रोनाल्डोच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याने विश्वचषकाच्या जर्सीतून अखेरचा सलाम केला आणि सहा विश्वचषकांचा अविस्मरणीय प्रवास संपला. सामन्यानंतर रोनाल्डो म्हणाला, ‘अशा पद्धतीने विश्वचषकातून बाहेर पडावे लागल्याचे दुःख आहे. मात्र, मी माझे सर्वस्व दिले आहे आणि कोणतीही खंत मनात नाही. फुटबॉलपटूचे आयुष्य असेच असते. पुढे चालत राहावे लागते.’

विश्‍वचषकाचे स्‍वप्‍न अधुरे...

४१ वर्षीय रोनाल्डो हा विश्वचषकाच्या सहा स्पर्धांमध्ये गोल करणारा इतिहासातील एकमेव खेळाडू ठरला. यंदाच्या स्पर्धेत त्याने तीन गोल केले. मात्र, पाच बॅलन डी'ऑर, तसेच तीन महत्वाची विजेतेपदे जिंकूनही त्याचे विश्वचषकाचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT