टोरँटो; वृत्तसंस्था : ४१ वर्षीय महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न पोर्तुगालने जिवंत ठेवले आहे. अत्यंत नाट्यमय आणि थरारक ठरलेल्या ‘राऊंड ऑफ ३२’च्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा २-१ असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. एक गोलने पिछाडीवर पडल्यानंतर पोर्तुगालने रोनाल्डो आणि रामोसच्या गोलच्या जोरावर सामना अक्षरश: खेचून आणला. आता त्यांची गाठ कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनशी पडणार आहे.
पोर्तुगाल आणि क्रोएशिया यांच्यातील हा सामना कमालीचा रोमांचक ठरला, त्यामध्ये गोल, व्हीएआर इंटरव्हेन्शन्स, पेनल्टी आणि चक्क ३ बाद ठरवलेले गोल्स पाहायला मिळाले. तब्बल १९ मिनिटांच्या ‘स्टॉपेज टाईम’मुळे सामन्याचा शेवट वादळी ठरला.
क्रोएशियाच्या पेरिशिकने केला गोल
पूर्वार्धात पोर्तुगालने खेळावर नियंत्रण राखले, पण क्रोएशियाच्या शिस्तबद्ध बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. ५३ व्या मिनिटाला जोसिप स्टॅनिसिकच्या पासवर अनुभवी विंगर इव्हान पेरिशिकने गोल करत क्रोएशियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर रोनाल्डोने केलेला एक गोल ऑफसाईड ठरवण्यात आला.
रोनाल्डो आणि रामोसचा पलटवार
६८ व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी बहाल करण्यात आली. ख्रिस्तियानो रोनाल्डोने कोणतीही चूक न करता गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविचला चकवून गोल केला आणि सामना १-१ अशा बरोबरीवर आणला. ९४ वे मिनिटाला सामना एक्स्ट्रा टाईममध्ये जाणार असे वाटत असतानाच, राफेल लिआओच्या अप्रतिम क्रॉसवर बदली खेळाडू गॉन्सालो रामोसने बुलेट हेडर मारत पोर्तुगालला २-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली.
गाेल नाकारल्याने क्रोएशियन समर्थकांनी फेकल्या बाटल्या
सामन्याच्या १०३ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या जोस्को ग्वार्डिओलने गोल करत स्टेडियममध्ये जल्लोष निर्माण केला. मात्र, व्हीएआरच्या प्रदीर्घ तपासणीनंतर मारिओ पासालिक ऑफसाईड असल्याचे स्पष्ट झाले आणि पंचांनी हा गोल नाकारला. या निर्णयामुळे निराश झालेल्या क्रोएशियन समर्थकांनी मैदानावर बाटल्या फेकल्या, त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला.