ब्युनॉस आयर्स; वृत्तसंस्था : स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीच्या भारत दौर्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एक खास भेट पाठवली आहे. ही भेट म्हणजे अर्जेंटिनाने 2022 चा फिफा विश्वचषक जिंकलेल्या संघाची स्वाक्षरी केलेली जर्सी आहे.
मेस्सीच्या भारत दौर्याचे नियोजन करणारे सत्तारु दत्ता यांनी बुधवारी या वृत्ताला दुजोरा दिला. दत्ता यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, मी फेब्रुवारीमध्ये जेव्हा त्याला भारत दौर्याबद्दल भेटलो, तेव्हा मी त्याला सांगितले होते की, पंतप्रधानांचा 75वा वाढदिवस येत आहे. त्यावर त्याने पंतप्रधानांसाठी स्वाक्षरी केलेली जर्सी पाठवण्याचे आश्वासन दिले होते. ही जर्सी पुढील दोन-तीन दिवसांत पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.
दत्ता यांनी पुढे सांगितले की, या दौर्यादरम्यान मेस्सी आणि पंतप्रधान मोदी यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘गोट टूर ऑफ इंडिया 2025’ असे नाव दिलेल्या या दौर्यात मेस्सी 13 ते 15 डिसेंबरदरम्यान कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली येथे भेट देणार आहे. या दौर्याची सांगता 15 डिसेंबर रोजी राजधानीत पंतप्रधानांसोबतच्या भेटीने होणार आहे.
मेस्सीचा हा भारत दौरा 2011 नंतरचा पहिला दौरा असेल. त्यावेळी त्याने अर्जेंटिना संघाचे नेतृत्व करत कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये व्हेनेझुएला विरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळला होता, ज्यात अर्जेंटिना 1-0 ने जिंकला होता. फुटबॉलवेड्या कोलकाता शहरात त्या सामन्याची आठवण अजूनही ताजी आहे.