प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
स्पोर्ट्स

९ वर्षांत २२ 'पिंक' टेस्‍ट, ७३ टक्‍के सामने चार दिवसांत गुंडाळले! जाणून घ्‍या रंजक इतिहास

Ind vs Aus Pink Ball Test : 'पिंक' कसोटीतील टीम इंंडियाचे ४ सामने ३ दिवसांतच संपले!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील डे-नाईट कसोटी सामना ॲडलेडमध्‍ये 6 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. (Ind vs Aus Pink Ball Test) डे-नाईट कसोटी सामन्‍याला 'पिंक बॉल टेस्‍ट' या नावानेही ओळखलं जाते. कारण हा कसोटी सामना लाल ऐवजी गुलाबी चेंडूने खेळला जातो. मागील ९ वर्षांमध्‍ये एकूण २२ पिंक कसोटी सामने खेळले गेले आहेत. विशेष म्‍हणजे सर्वच सामने निकाल निघाले आहेत. यातील ७३ टक्‍के सामने चार दिवसांमध्‍ये गुंडाळले गेले तर २२ पैकी केवळ सहाच सामने पाच दिवस खेळले गेले आहेत. यातील १६ कसोटी सामन्‍यांचा निकाल चार किंवा त्‍यापेक्षाही कमी दिवसांमध्‍ये लागले आहे. जाणून घेवूया पिंक कसोटी सामन्‍यांचा रंजक इतिहास...

२०१५ मध्‍ये सुरु झाला पिंक कसोटीचा थरार,ऑस्‍ट्रेलिया अग्रस्‍थानी!

कसोटी क्रिकेटच्‍या इतिहासात डे-नाईट कसोटी सामना सर्वात प्रथम २०१५ मध्‍ये झाला. ऑस्‍ट्रेलियातील ॲडलेड ओव्हलवर ऑस्‍ट्रेलिया आणि न्‍यूझीलंड संघ आमने-सामने होते. हा सामना ऑस्‍ट्रेलियाने तीन विकेट्सने जिंकला. विशेष म्‍हणजे पिंक कसोटी सामन्‍यात विजयी सलामी देणार्‍या ऑस्‍ट्रेलिया संघाने आपली जिंकण्‍याची परंपरा कायम ठेवली आहे. २०१५ पासून ऑस्‍ट्रेलियाने १२ पिंक कसोटी सामने खेळले असून त्‍यातील तब्‍बल ११ सामने जिंकले आहेत. १२ पैकी एक पराभव हा कसोटी क्रिकेटमध्‍ये दबदबा नसणार्‍या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झाला आहे.

टीम इंडियाही पिंक कसोटीत भारी

भारताने आतापर्यंत चारपैकी तीन पिंक कसोटी सामने मायदेशात तर एक सामना ऑस्ट्रेलियात खेळला आहे. भारताने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळलेली पहिली पिंक कसोटी तीन दिवसांत निकाली निघाली होती. मात्र यानंतर डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत भारताला तीन दिवसांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. २०२०-२१ मधील भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ही पहिला कसोटी सामना होता. या सामन्‍यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला आठ विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये भारताने इंग्लंडविरुद्धची डे-नाईट कसोटी अवघ्या दोन दिवसांत जिंकली. 2022 मध्ये बेंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळली गेलेली पिंक कसोटी टीम इंडियाने श्रीलंकेचा तीन दिवसांमध्‍येच पराभव केला होता.

पिंक कसोटीमध्‍ये सर्वाधिक शतके ही ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन याच्‍या नावावर आहेत.

पिंक कसोटीमध्‍ये २७ शतकवीर, लॅबुशेन 'टॉप'ला

पिंक कसोटीमध्‍ये आतापर्यंत २७ फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक चार शतके ठोकली आहेत. पाकिस्तानचा असद शफीक, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि ऑस्‍ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड हे प्रत्येकी दोन शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. 17 फलंदाजांनी शतकी खेळी साकारली आहे.

पिंक कसोटीमध्‍ये आतापर्यंत भारताच्‍या विराट कोहलीनेच शतक झळकावले आहे.

'पिंक' कसोटीत टीम इंडियात केवळ विराटच शतकवीर

टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज विराट कोहली हा पिंक कसोटीत शतक झळविणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. कोहलीने नोव्हेंबर 2019 मध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे बांगलादेशविरुद्ध 136 धावांची खेळी केली होती. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पर्थ कसोटीत विराट कोहलीला सूर गसवला. त्‍याने दुसर्‍या डावात १०० धावांची नाबाद खेळी केली आहे. आता ॲडलेडमध्येही चाहत्‍यांच्‍या नजरा विराटच्‍या कामगिरीकडे वेधले आहे.

'ॲडलेड ओव्हल' भारतासाठी आव्‍हानात्‍मक

ॲडलेडमध्ये भारताने आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने यापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले असून, आठ सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने 2003 मध्ये ॲडलेडमध्ये पहिली कसोटी जिंकली होती. 2018 मध्ये देखील टीम इंडियाने ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाचा 31 धावांनी पराभव केला होता.ऑस्ट्रेलियाने ॲडलेड ओव्हलवर आतापर्यंत 82 कसोटी सामने खेळले असून 45 जिंकले आहेत. कांगारूंना 18 कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १९ सामने अनिर्णित राहिले आहेत.

ऑस्‍ट्रेलियात भारताने जिंकले ५३ पैकी केवळ १० कसोटी सामने!

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आतापर्यंत एकूण 108 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 33 सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने 45 सामने जिंकले आहेत. २९ कसोटी सामने अनिर्णित राहिल्या, तर एक कसोटी बरोबरीत राहिली. ऑस्ट्रेलियात दोन्ही संघांमध्ये एकूण 53 सामने झाले आहेत. यापैकी भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 30 सामने जिंकले आहेत. 13 कसोटी अनिर्णित राहिल्या.

'पिंक' कसोटीमधील शतकवीर कंसात धावा

  • मार्नस लॅबुशेन ऑस्‍ट्रेलिया, (162), (143), (103), (120).

  • ट्रॅव्हिस हेड, ऑस्‍ट्रेलिया (101), (114*)

  • दिमुथ करुणारत्ने श्रीलंका (196),(107)

  • असद शफीक, पाकिस्तान (137), (112)

  • विराट कोहली, भारत (136)

  • अझर अली, पाकिस्तान (302)

  • डॅरेन ब्राव्हो, वेस्ट इंडीज (116)

  • फाफ डु प्लेसिस, दक्षिण आफ्रिका (118)

  • उस्मान ख्वाजा, ऑस्ट्रेलिया (145)

  • स्टीफन कुक, दक्षिण आफ्रिका (104)

  • स्टीव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया (130)

  • पीटर हँड्सकॉम्ब, ऑस्ट्रेलिया (105)

  • ॲलिस्टर कुक इंग्लंड 243,

  • जो रूट इंग्लंड (136)

  • शॉन मार्श ऑस्ट्रेलिया (126)

  • एडन मार्कराम, दक्षिण आफ्रिका (125)

  • केन विल्यमसन, न्यूझीलंड (102)

  • हेन्री निकोल्स, न्‍यूझीलंड (145)

  • डेव्हिड वॉर्नर, ऑस्‍ट्रेलिया ( 335)

  • यासिर शाह, पाकिस्‍तान (113)

  • टॉम ब्लंडेल, न्यूझीलंड (138)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT