नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: जगभरात 'फ्लाइंग सिख' या नावाने ओळखले जाणारे भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे चंदीगड येथे कोरोनामुळे निधन झाले. भारतीय अथलेटिक क्षेत्राला जगभरात चमकवण्यात त्यांचा सिंहांचा वाटा होता. मात्र, मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख नाव का पडलं हे तुम्हाला माहिती आहे का?.
मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकली आहेत. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये १९६० साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. शुक्रवारी रात्री वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
कसं पडलं फ्लाइंग शीख नाव?
मिल्खा सिंग यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता. पण फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. वयाच्या १७व्या वर्षी भारतीय सैन्यात मिल्खा सिंग भरती झाले. आपल्या धावण्याच्या कौशल्याने त्यांनी जगभर भारताला पदकं मिळवून दिली आणि फ्लाइंग सिख ही उपाधी मिळवली.
'मिल्खा धावत नव्हता, उडत होता'
मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख हा किताब पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी दिला होता. लाहोरमध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय शर्यतीत मिल्खा सिंग यांनी भाग घेतला होता. या शर्यतीच्या वेळी भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण होतं. पण असं असताना देखील मिल्खा सिंग यांना पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते. मिल्खा सिंग यांच्या नावाचाच सर्वत्र जल्लोष होता.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान हे त्यावेळी ही शर्यत पाहण्यास उपस्थित होते. पाकिस्तानचा सर्वोत्कृष्ट धावपटू अबू खालिदला मिल्खा सिंग यांनी हरवले होते. मिल्खा सिंग यांचं धावण्याचं कौशल्य पाहून आयूब खान थक्क झाले होते.
मिल्खा सिंग यांना सुवर्णपदक देताना ते म्हणाले,' मिल्खा आज तू धावत नव्हतास, तू उडत होतास'. तुझ्या या असामान्य वेगासाठी मी तुला द फ्लाइंग सिख हा खिताब देतो. तो कबूल कर' तेव्हापासून मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख म्हणूनच ओळखले जाते.