PCB Chairman Mohsin Naqvi: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांना आगामी ICC बोर्ड बैठकीसह IPL 2026 फायनलसाठी भारतात येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ICC ची महत्त्वाची बोर्ड बैठक आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 ची अंतिम फेरी या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणार आहे. IPL 2026 ची फायनल 31 मे रोजी खेळवली जाणार असून, त्याच सुमारास ICC च्या बैठकींचेही आयोजन करण्यात आले आहे.
ICC कडून क्रिकेटच्या भविष्यातील दिशा आणि विशेषतः World Test Championship (WTC) च्या रचनेबाबत चर्चा करण्यासाठी विविध बैठका घेतल्या जाणार आहेत. Chief Executives Committee (CEC) ची बैठक 21 मे रोजी ऑनलाइन होणार आहे, तर 30 आणि 31 मे रोजी अहमदाबादमध्ये प्रत्यक्ष बोर्ड बैठक आयोजित केली जाणार आहे.
मात्र, भारत-पाकिस्तानमधील राजकीय तणाव आणि क्रिकेट संबंधांतील दुरावा लक्षात घेता मोहसिन नक्वी प्रत्यक्ष भारतात येणार का, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. वृत्तानुसार, PCB प्रमुखांनी हे निमंत्रण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे पाठवले असून, भारतात जाण्याबाबत अंतिम निर्णय ते घेणार आहेत.
विशेष म्हणजे, ICC च्या या बैठका मूळतः मार्च-एप्रिल महिन्यात कतारमधील दोहा येथे होणार होत्या. मात्र, प्रादेशिक तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
दरम्यान, जर मोहसिन नक्वी भारतात आले, तर सध्याच्या भारत-पाकिस्तान संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाऊ शकते.