मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएल-2022 च्या लीगमधील शेवटच्या साखळी सामन्यात पंजाबचे बल्ले बल्ले झाले. प्रथम गोलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादला (PBKS vs SRH) 157 धावांत रोखल्यानंतर पंजाबी फलंदाजांनी दे दणादण फटकेबाजी करीत 29 चेंडू आणि 5 विकेट राखून सामना जिंकून शेवट गोड केला. या सामन्याच्या निकालाने गुणतालिकेत फारसा फरक पडणार नसला तरी पंजाबने आपली कामगिरी सुधारताना 14 गुणांसह सहावे स्थान पटकावत स्पर्धेचा निरोप घेतला. हैदराबाद संघ 12 गुणांसह आठव्या स्थानावर राहिला.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 157 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन या जोडीने हैदराबादची आक्रमक सुरुवात केली. तिसर्या षटकात फझलहक फारुखीने बेअरस्टोचा त्रिफळा उडवला. त्याच्या जागी आलेल्या शाहरूख खाननेही आल्या आल्या फटकेबाजी सुरू केली. 10 चेंडूंत 19 धावा करून तो बाद झाला. कर्णधार मयंक अग्रवाल (1) याने निराशा केली.
तीन विकेटस् पडल्या असल्या तरी हैदराबाद संघ 10 च्या सरासरीने धावा करीत होता. यानंतर शिखर धवनच्या जोडीला लियाम लिव्हिंगस्टोन आला. त्यानेही पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून लय पकडली. दोघांची बहरत आलेली 31 धावांची भागीदारी फारुखीने मोडताना शिखर धवनला (39) बाद केले. जितेश शर्माही 19 धावांवर बाद झाला. हैदराबादच्या विकेट पडत असल्या तरी त्यांची आवश्यक धावगती सहापेक्षा कमी होती. लिव्हिंगस्टोनने जे सुचित आणि शेफर्डवर हल्ला चढवत 15.1 षटकांत सामना संपवला. तो 49 धावांवर नाबाद राहिला. (PBKS vs SRH)
तत्पूवी, सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय तिसर्याच षटकात त्यांच्या अंगलट आला. कागिसो रबाडाने तिसर्या षटकात हैदराबादला पहिला धक्का दिला. प्रियम गर्ग (4) मयंक अग्रवालकडून झेलबाद झाला. अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव सावरला. दोघांची 47 धावांची भागीदारी हरप्रीत ब्रारने संपुष्टात आणली. त्रिपाठी 20 धावांवर शिखर धवनच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
हरप्रीतने पुढील षटकात हैदराबादला आणखी एक धक्का दिला. अभिषेक 32 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 43 धावांवर माघारी परतला. निकोलस पूरन (5) अपयशी ठरला, एलिसने त्याला बाद केले. एडन मार्कराम (21) चांगला खेळत होता; परंतु हरप्रीतच्या फिरकीला समजण्यात तो चुकला अन् जितेश शर्माने तितक्याच चपळतेने त्याला यष्टीचित केले. हैदराबादचा निम्मा संघ 96 धावांत माघारी परतला होता. हरप्रीतने 4 षटकांत 26 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
वॉशिंग्टन सुंदर व रोमारिओ शेफर्ड यांनी अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. सुंदर व शेफर्ड यांनी 26 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हैदराबादने 8 बाद 157 धावा केल्या.