स्पोर्ट्स

PBSK vs DC IPL 2026 : पंजाबसाठी 'करो या मरो', दिल्लीचे आव्हान रोखण्याचा निर्धार

बाद फेरी गाठण्यासाठी पंजाबला अद्याप किमान दोन विजयांची आवश्यकता

रणजित गायकवाड

धर्मशाळा : सुरुवातीला दमदार कामगिरीनंतर सलग 3 पराभव पचवावे लागलेल्या पंजाब किंग्ज संघ आज (सोमवार, दि. 11) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लढतीत मैदानात उतरेल, त्यावेळी त्यांना पराभवाचे सत्र रोखण्यासाठी आणि बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागेल, असे चित्र आहे. पंजाब किंग्जसाठी 17 मे पर्यंतचे घरच्या मैदानातील तीन सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

स्पर्धेत एकेकाळी एकमेव अपराजित संघ असलेल्या पंजाबला आता तिन्ही विभागांत सुधारणा करण्याची गरज आहे. बाद फेरी गाठण्यासाठी पंजाबला अद्याप किमान दोन विजयांची आवश्यकता आहे. स्पर्धेच्या पूर्वार्धात ज्या धोरणांनी यश मिळवून दिले, त्याच धोरणांवर खेळाडूंनी ठाम राहावे, अशी श्रेयसची अपेक्षा आहे. आम्ही या स्पर्धेत स्वप्नवत सुरुवात केली होती, खेळाडूंची मानसिकता सकारात्मक होती. आताही त्याच मानसिकतेवर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. नकारात्मक चर्चेने लक्ष भरकटणे सोपे असते, पण आम्हाला गेल्या तीन सामन्यांतील चुकांचे विश्लेषण करून जोरदार पुनरागमन करावे लागेल, असे कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्ट केले.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने गेल्या 6 पैकी 5 सामने गमावल्याने त्यांचे लक्ष आता आगामी हंगामावर लागल्याचे चित्र आहे. कुलदीपचा खराब फॉर्म आणि स्टार्कचे उशिराचे आगमन याचा त्यांना फटका बसला.

पुढील हंगामाची तयारी?

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला, पुढील हंगामासाठी आम्हाला आतापासूनच नियोजन करावे लागेल. आमचा दृष्टिकोन काय असावा आणि बेंचवर बसलेल्या कोणत्या खेळाडूंना संधी देता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत. गणितीयदृष्ट्या दिल्ली अद्याप शर्यतीतून बाहेर नसली, तरी पुढील वाटचाल बिकट असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT