अॅडलेड; वृत्तसंस्था : पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या भेदक गोलंदाजीमुळे तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले आहे. विजयासाठी 435 धावांचे विक्रमी लक्ष्य समोर असताना इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 6 बाद 207 धावा केल्या असून, ते अजूनही 228 धावांनी मागे आहेत.
इंग्लंडच्या डावाची सुरुवात होताच कर्णधार पॅट कमिन्सने धक्के देण्यास सुरुवात केली. त्याने बेन डकेट आणि ऑली पोपला स्वस्तात बाद केले. त्यानंतर जो रूटला (33 धावा) पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढून इंग्लंडचे कंबरडे मोडले. कसोटी क्रिकेटमध्ये कमिन्सने रूटला बाद करण्याची ही 13 वी वेळ आहे. इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्राऊलीने 85 धावांची संयमी खेळी केली. त्याने जो रूटसोबत 78 धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नॅथन लायनच्या चेंडूवर यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीने त्याला चपळाईने यष्टिचीत केल्यामुळे त्याची खेळी संपुष्टात आली.
दिवसाच्या अखेरच्या सत्रात नॅथन लायनने आपली जादू दाखवली. त्याने हॅरी ब्रूक आणि कर्णधार बेन स्टोक्स (10 वी वेळ) यांना बाद करून इंग्लंडच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. लायनने 164 धावांत 3 बळी घेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड केले. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 349 धावांवर संपला. स्थानिक हिरो ट्रॅविस हेडने 170 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याला अॅलेक्स कॅरीने 72 धावा करून चांगली साथ दिली. इंग्लंडच्या जोश टंगने 4 बळी घेत ऑस्ट्रेलियन शेपूट लवकर गुंडाळले, मात्र तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने 434 धावांची मोठी आघाडी घेतली होती.