पुढारी ऑनलाईन डेस्क : Paris Paralympics 2024 : भारतीय पॅरा बॅडमिंटनपटू मनीषा रामदास हिने रविवारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिला एकेरीच्या एसयु-5 उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या मामिको टोयोडा हिचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मनीषाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि जपानी प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले. तिने पहिला गेम 13-21 अशा फरकाने जिंकला. ही लय कायम ठेवत भारतीय शटलरने दुसरा गेमही 16-21 ने जिंकला. याचबरोबर सामन्याचा निकाल 30 मिनिटे लागला, ज्यात मनीषाने सहज विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठली.
मनीषाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केल्याने भारताला आपल्या तालिकेत आणखी एक पदक जोडण्याची आशा आहे. सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकली आहेत.
शनिवारी भारताची नेमबाज रुबिना फ्रान्सिस हिने चमकदार कामगिरी करत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये कांस्यपदक पटकावले. पॅरालिम्पिकमधील नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक ठरले.